बसर अल-असाद यांच्या पत्नीने सोडली साथ
रशियात घटस्फोटासाठी अर्ज केला दाखल : असाद अडचणीत
वृत्तसंस्था/ मॉस्को
सीरियात सत्तापालट झाल्यावर अध्यक्ष बसर अल असाद यांचे कुटुंब रशियात आहे. असाद यांनीही रशियात आश्रय घेतला आहे. परंतु याचदरम्यान असाद यांच्या ब्रिटिश पत्नी अस्मा अल-असाद यांनी मॉस्को येथील स्वत:च्या जीवनाबद्दल नाराजी व्यक्त करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कथितपणे अस्मा या रशियात राहू इच्छित नाहीत. घटस्फोटानंतर त्या लंडन येथे वास्तव्यास जाणार आहेत.
अस्मा यांनी रशियन न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून मॉस्को सोडण्यासाठी विशेष अनुमती मागितली आहे. त्यांच्या अर्जाचे मूल्यांकन सध्या रशियन अधिकारी करत आहेत. अस्मा यांच्याकडे ब्रिटिश तसेच सीरियाचे नागरिकत्व आहे. त्यांचा जन्म अन् पालनपोषण लंडनमध्ये झाले आहे. अस्मा या 2000 साली सीरियात दाखल झाल्या होत्या. त्याच वर्षी वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी असाद यांच्यासोबत विवाह केला होता.
असाद यांची संपत्ती रशियाने गोठविली
असाद अद्याप अनेक गंभीर निर्बंधांना सामोर जात आहेत. असाद यांना मॉस्कोतून बाहेर पडण्याची किंवा कुठल्याही राजकीय कार्यक्रमात सामील होण्याची अनुमती नाही. रशियन अधिकाऱ्यांनी त्यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांच्या संपत्तीत 270 किलोग्रॅम सोने, 2 अब्ज डॉलर्स आणि मॉस्को येथील 18 अपार्टमेंट सामील आहेत.
असाद यांच्या बंधूला आश्रय नाकारला
असाद यांचे बंधु माहेर अल-असाद यांना रशियात आश्रय देण्यात आलेला नाही आणि त्यांच्या विनंती अर्जाची अद्याप समीक्षा केली जात आहे. माहेर आणि त्यांचे कुटुंब रशियात नजरकैदेत आहे. हयात तहरीर अल-शामच्या नेतृत्वात बंडखोरांनी डिसेंबरच्या प्रारंभी असाद यांची सत्ता उलथवून टाकली होती.