महांतेश कवटगीमठ यांना ‘बसव पुरस्कार’
शिक्षण, सहकारातील योगदानाची दखल : बेंगळूर येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षण व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांना 2026 सालचा प्रतिष्ठित ‘बसव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बसव परिषदेच्यावतीने बेंगळूर येथील कोंडज्जी बसप्पा सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार तथा माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान करण्यात आला.
महांतेश कवटगीमठ यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात कार्यरत राहून शिक्षण, सहकार, उद्योग व समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. केएलई संस्थेच्या विकासात सक्रिय भूमिका बजावताना त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. तसेच दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना व सहकार क्षेत्राशी संबंधित विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर कवटगीमठ यांनी जगद्ज्योती बसवेश्वर यांच्या विचारांचे स्मरण केले. महात्मा बसवेश्वर हे समानतेचे प्रणेते होते. समान समाजनिर्मितीसाठी त्यांनी ‘कायक’ व ‘दासोह’ या संकल्पना दिल्या. त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. हा सन्मान केएलई संस्थेच्या उभारणी व विकासासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठांना, देणगीदारांना, शिक्षकांना व सहकाऱ्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आई-वडील, पत्नी, भाऊ व आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंचे स्मरण करून पुरस्कारासाठी बसव परिषद व बसव भक्तांचे त्यांनी आभार मानले.
बसवराज बोम्माई यांनी कवटगीमठ यांचे अभिनंदन करताना त्यांच्या शिक्षण, सहकार, उद्योग व समाजसेवेतील योगदानाचा गौरव केला. यावेळी कुडलसंगम बसवधर्म पीठाच्या आद्य माता गंगादेवी, सहकार मंत्री लक्ष्मण सवदी, माजी मंत्री पीजीआर सिंदिया, माजी मंत्री दिनेश गुंडूराव, विधानपरिषद सदस्य टी. ए. शरवण, लोकायुक्त डीवायएसपी बसवराज यलिगार, उद्योगपती मानंदी रमेश, बसव परिषदेचे गौरवाध्यक्ष एम. पी. उमादेवी, अध्यक्षा रेखा हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते.