For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शिक्षक नसतानाही मतदार यादीत नाव; बार्शीत 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

04:42 PM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिक्षक नसतानाही मतदार यादीत नाव  बार्शीत 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement
बार्शी | प्रतिनिधी : शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत शिक्षक नसतानाही नाव समाविष्ट केल्याच्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करताना संबंधितांनी दोन शाळांतील शिक्षक असल्याची प्रमाणपत्रे सादर केल्याचे समोर आले आहे. मात्र, शाळांकडून करण्यात आलेल्या पडताळणीत हे 11 जण संबंधित शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणामुळे शिक्षक मतदार यादीच्या पडताळणीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतर पडताळणी

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना 22 सप्टेंबर रोजी शिक्षक व पदवीधर मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत शिक्षक नसलेल्या काही व्यक्तींची नावे समाविष्ट असल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली.

Advertisement

निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार झोनल अधिकारी तथा बार्शीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी संबंधित अर्जांची पडताळणी सुरू केली. मतदार नोंदणीसाठी अर्जदारांनी पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील एम. जी. गुरुकुल आणि बार्शी तालुक्यातील जोतिबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षक असल्याची प्रमाणपत्रे सादर केली होती.

या प्रमाणपत्रांवर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के असल्याचे अर्जांच्या तपासणीत आढळले.

Advertisement

दोन्ही शाळांकडून माहिती मागवली

गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड यांनी 17 ऑक्टोबर रोजी संबंधित शाळांकडून पत्राद्वारे माहिती मागवली. त्यानंतर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी 18 ऑक्टोबर रोजी उत्तर देताना संबंधित व्यक्ती शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नसल्याचे कळवले.

दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अर्जांमध्ये नमूद केलेल्या शाळांमध्ये हे 11 जण शिक्षक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी तथा झोनल अधिकारी गजानन बाजड यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

11 जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणात जोतिबाची वाडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाशी संबंधित असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेल्या मोहन बाळासाहेब भोसले, अक्षय श्रीहरी चव्हाण आणि तुषार मोहन भोसले यांचा समावेश आहे.

तसेच, पेहे येथील एम. जी. गुरुकुल प्रशालेत शिक्षक असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेल्या स्वप्निल अंबरूषी कापसे, रोहित बाबासाहेब कापसे, पृथ्वीराज बाळासाहेब कापसे, शुक्राचार्य शाहूराजे बाबर, सूरज युवराज बाबर, सुदेश नवनाथ कापसे, अभिजित बापू डिसले आणि संतोषी किशोर घेडे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तक्रारीनुसार, या व्यक्तींनी शिक्षक मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी चुकीची किंवा बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. या आरोपांची कायदेशीर पडताळणी आणि पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

स्वाक्षरी आणि शिक्क्यांची फॉरेन्सिक तपासणी

संबंधित अर्जांवरील मुख्याध्यापकांच्या स्वाक्षऱ्या आणि शाळांचे शिक्के खरे आहेत की त्यांचा गैरवापर झाला आहे, याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी कागदपत्रे फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

शिक्षक मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रांच्या सत्यतेचा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. मात्र, संबंधित व्यक्तींविरुद्धचे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. पोलिसांच्या तपासातून कागदपत्रांची सत्यता आणि या प्रकरणातील जबाबदारी निश्चित होणार आहे.

Advertisement
Tags :

.