शहरात बॅरिकेड्स लावून रस्ते अडविले
केवळ रंगोत्सवासाठीच पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविले : कायमस्वरुपी हटविण्याची मागणी
बेळगाव : एका बाजूला शहरात बॅरिकेड्स लावून रस्ते अडविलेले तर दुसरीकडे बॅरिकेड्स काढून रस्ता खुला केलेला असा विरोधाभास पहावयाला मिळाला. टिळकवाडी पहिले रेल्वेगेट येथे गेल्या 14 वर्षांपासून बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. हे बॅरिकेड्स हटवावेत यासाठी सुभाष घोलप आणि टिळकवाडीतील काही नागरिक सातत्याने आंदोलन करीत आहेत. तथापि, ही अपघातप्रवण जागा आहे, असे सांगून प्रशासनाने येथील बॅरिकेड्स हटविण्यास ठाम नकार दिला आहे. मात्र मंगळवारी धुळवडीदिवशी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स काढण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना सुखद धक्का बसला. परंतु पुन्हा हे बॅरिकेड्स पूर्ववत लावण्यात आले. दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये खबरदारी म्हणून बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे लोकांना वळसा घालून जावे लागले. मात्र पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटवावेत या मागणीची प्रशासनाने एक दिवसापूरतीच दखल घेतली. या ठिकाणी सिग्नल लावावेत व वाहतूक पोलीस नेमावेत, अशी मागणीही होत आहे.
