ठिकठिकाणी बॅरिकेड्स, शहरवासियांची गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. राणी चन्नम्मा सर्कलचा मुख्य मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करून सदर मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे नागरिकांना समस्यांच्या सामना करावा लागला. तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहावयास मिळाले. याचा परिणाम कर्मचारी, रेल्वे प्रवासी, बसप्रवासी व सर्वसामान्य नागरिकांवर झाला.
शहरात राज्योत्सवाच्या नावाखाली धुडगूस घालण्यात येतो. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. यामुळे पोस्टमन सर्कल, सीबीटी समोरील रस्त्यांसह विविध ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता बंद केल्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसल्यामुळे ते पुढे गेल्यानंतर कोठे जायचे हे समजत नव्हते. त्यामुळे परतून माघारी येण्याचे प्रकारही घडत होते. परिणामी त्यांना गर्दीचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पोलिसांकडून कोणत्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत किंवा कोणत्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे याची माहिती नागरिकांना नव्हती. यामुळे नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडले होते. मात्र बॅरिकेड्स लावून प्रवेशबंदी केल्याची कल्पना त्यांना नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. तसेच मोठा वळसा घालून माघारी फिरावे लागले. राज्योत्सवामुळे शहरात प्रवेशबंदी केल्याने एकंदरीत शहरवासियांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांसह विविध खासगी संस्थांनाही सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. शहरात येण्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर जाणे मुश्किल बनले होते. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्यात आल्याने मोठा वळसा घालून त्यांना कामावर जावे लागले. राज्योत्सवाचा कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
राज्योत्सवाचा सर्वाधिक फटका बस प्रवशांवर झाला. शहरात इतर राज्यातील प्रवासी आपल्या विविध कामांसाठी येत असतात. मात्र, शनिवारी राज्योत्सव आचरणात येण्याची कल्पना किंवा माहिती नव्हती. यामुळे ते शनिवारी सकाळपासूनच शहरात प्रवेश करीत होते. मात्र, माघारी जाण्यासाठी त्यांना वेळेवर बसेस नसल्याने प्रवाशांची हेळसांड झाली. बसस्थानकातही अपुऱ्या बसेस परराज्यात सोडण्यात आल्याने याचाही फटका प्रवाशांना सोसावा लागला. महाराष्ट्र व गोवा राज्यांतून प्रवासी शहरात येत असतात. मात्र शनिवारी त्यांना मार्ग बंद असल्याने व अपुऱ्या बसेसचा सामना करावा लागला. परिणामी वेळेचा अपव्यय होऊन त्यांना उशीरा घर गाठावे लागले.
शहरात राज्योत्सव साजरा करताना शहरासह उपनगरांतून मिरवणूक काढण्यात येते. यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने सोडण्यात आली होती. दरम्यान, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी प्रवाशांना फार मोठा वळसा घालून जावे लागले. काही नागरिक नोकरी व इतर भागात जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करतात. मात्र, शनिवारी त्यांना नियमित वेळेच्या अगोदर घराबाहेर पडून रेल्वे स्थानकाकडे जावे लागले. शहर परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा सामनाही रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना करावा लागला. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातून मिरवणूक काढण्यात येते. सदर मिरवणूक राणी चन्नम्मा सर्कल येथे एकत्र येतात. यामुळे पोलीस प्रशासनाकडून ग्लोब
टॉकीज रोड, लक्ष्मी कॉम्प्लेक्स रोड, आरटीओ सर्कल, क्लब रोडवरून शहरात येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली होती. यामुळे दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना व विविध कामासाठी बाहेर पडणाऱ्या शहरवासियांना समस्या निर्माण झाली होती. त्याचबरोबर राणी चन्नम्मा सर्कलनजीकच सिव्हिल हॉस्पिटल असल्याने तेथील रुग्णांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांवर याचा मोठा परिणाम झाल्याचे पाहावयास मिळाले .