बडोद्याची विजयी हॅट्ट्रिक, ओडिसाला डावाने नमवले
सामनावीर कृणाल पंड्याची अष्टपैलू खेळी : गुणतालिकेत बडोदा अव्वलस्थानावर
वृत्तसंस्था/ वडोदरा
रणजी ट्रॉफी स्पर्धेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा सलग तिसरा विजय मिळवला. अ गटातील तिसऱ्या सामन्यात बडोदा संघाने ओडिशाला 1 डाव व 98 धावांनी नमवले. शतकी खेळी व 1 बळी मिळवणाऱ्या कृणाल पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, बडोदा संघाचा पुढील सामना 6 नोव्हेंबरपासून त्रिपुराविरुद्ध आगरतळा येथे खेळवण्यात येईल.
सामन्याच्या प्रारंभी ओडिसाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बडोद्याच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना ओडिसाला पहिल्या डावात 193 धावांत गुंडाळले. ओडिसाकडून बिप्लव समंत्रयने सर्वाधिक 58 धावा केल्या तर आशिर्वाद स्वानने 37, सुर्यकांत प्रधानने 18 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. ओडिसाकडून महेश पिठायाने 5 तर आकाश सिंग व भार्गव भट्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युतरात खेळताना बडोद्याने शिवालिक शर्मा (96), विष्णू सोळंकी (98) व कर्णधार कृणाल पंड्या (119) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 456 धावा केल्या व 263 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर ओडिसाचा संघ दुसऱ्या डावात देखील सपशेल अपयशी ठरला. बडोद्याच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर ओडिसाच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यांचा दुसरा डाव 34 षटकांत 165 धावांत आटोपला गेला. अनुराग सारंगीने 49 तर कार्तिक बिस्वालने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या. बडोद्याकडून निनाद रातवाने सर्वाधिक 6 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बडोद्याने हा सामना डावाने जिंकताना बोनस गुणाची कमाई करत गुणतालिकेत आपले अव्वलस्थान आणखी भक्कम केले.
दरम्यान, यंदाच्या रणजी हंगामात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या बडोदा संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. पहिल्या लढतीत त्यानी मुंबईला नमवले होते. दुसऱ्या सामन्यात सेनादलाचा धुव्वा उडवला होता. यानंतर ओडिसाला डावाने नमवत त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
संक्षिप्त धावफलक
ओडिसा प.डाव 193 व दुसरा डाव 165
बडोदा 456
मुंबईकडे 155 धावांची आघाडी
आगरतळा : रणजी चषक स्पर्धेतील अ गटातील त्रिपुराविरुद्ध सामन्यात मुंबईने पहिल्या डावातील 155 धावांच्या आघाडीच्या जोरावर सामन्यावर आपली पकड मिळवली आहे. मुंबईने पहिल्या डावात 450 धावा केल्यानंतर प्रत्युतरात खेळताना त्रिपुराचा पहिला डाव 302 धावांत आटोपला. त्रिपुराकडून जीवनज्योत सिंगने 118 धावांची खेळी साकारली. याशिवाय, कर्णधार मनदीप सिंगने 62 तर श्रीदम पॉलने 52 धावा केल्या. त्रिपुराचे इतर फलंदाजांना मात्र अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. मुंबईकडून हिमांशू सिंगने 6 तर शम्स मुलाणीने 3 गडी बाद केले. यानंतर दुसऱ्या डावात खेळताना मुंबईची खराब सुरुवात झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 3 षटकांत 2 गडी गमावत 7 धावा केल्या आहेत. सलामीवीर रघुवंशी 6 तर आयुष म्हात्रे 1 धावा काढून बाद झाले. मुंबईकडे आता 155 धावांची आघाडी असून आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे.
जम्मू काश्मीरने सेनादलाला डावाने नमवले
श्रीनगर येथे झालेल्या रणजी ट्रॉफीतील अन्य एका लढतीत जम्मू काश्मीरने सेनादलावर 1 डाव व 25 धावांनी विजय मिळवला. या विजयासह जम्मू काश्मीरला बोनस गुणासह 7 गुण मिळाले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेनादलाचा संघ 71 धावांत गारद झाला. यानंतर जम्मू संघाने पहिल्या डावात 228 धावा केल्या व 157 धावांची आघाडी त्यांनी घेतली. यानंतर दुसऱ्या डावातही सेनादलाचा संघ अपयशी ठरला. त्यांचा संपूर्ण संघ 132 धावांत ऑलआऊट झाला.