बडोदा संघाचा पंजाबवर विजय
वृत्तसंस्था / हैदराबाद
सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात अष्टपैलू हार्दीक पंड्याच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बडोदा संघाने पंजाबचा 7 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात पंजाब संघातील अभिषेक शर्माचे अर्धशतक वाया गेले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 8 बाद 222 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाने 19.1 षटकांत 3 बाद 224 धावा जमवित विजय नोंदविला.
पंजाबच्या डावामध्ये सलामीच्या अभिषेक शर्माने 4 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा झळकविल्या. अनमोलप्रित सिंगने 32 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह 69 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाच्या डावात हार्दीक पंड्याने 42 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 77 धावांची खेळी केली. शिवलिक शर्माने 47 धावांवर असताना दुखापत झाल्याने तो निवृत्त झाला. शेषवत कुमारने 31 धावा केल्या तर विष्णू सोळंकीने 43 धावा जमविल्या. आता या स्पर्धेत बडोदा संघ क गटामध्ये 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात गुजरात 12 गुणांसह पहिल्या तर पंजाब 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात गुजरातने पुदुचेरीचा 9 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पुदुचेरीचा डाव 13.1 षटकांत 83 धावांत आटोपला. त्यानंतर गुजरातने 9 षटकांत 1 बाद 84 धावा जमवित विजय नोंदविला. आर्या देसाईने नाबाद 53 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक : पंजाब 20 षटकांत 8 बाद 222 (अभिषेक शर्मा 50, अनमोलप्रित सिंग 69, लिंबानी 3-36), बडोदा 19.1 षटकांत 3 बाद 224 (हार्दीक पंड्या नाबाद 77, शिवलिक शर्मा 47)
पुदुचेरी 13.1 षटकांत सर्वबाद 83 (भट्ट, रवी बिस्नॉई प्रत्येकी 3 बळी, नागवसवाला 2-22), गुजरात 9 षटकांत 1 बाद 84 (आर्या देसाई नाबाद 53).