आज सायंकाळपर्यंत बार्देशला मिळेल पाणी
पणजी : तिळारी धरणातून गोव्याकडे येणाऱ्या कालव्याची दुरुस्ती करण्यात आली असून आज मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळपर्यंत बार्देशमध्ये पाणी पोहोचेल आणि बार्देशची तहान भागेल अशी खात्री जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वर्तवली आहे. पत्रकार परिषदेत शिरोडकर यांनी सांगितले की, कुडासे, सिंधुदुर्ग येथे कालवा फुटल्याने गोव्याकडे येणारे पाणी बंद झाले होते आणि त्याचा परिणाम पेडणे - बार्देश या तालुक्यात दिसून आला होता. तिळारी धरणाची व गोव्याकडे येणाऱ्या कालव्यांची पाहणी करण्यासाठी गेलेलो असतानाच हा प्रकार घडला होता.
धरणासाठी व गोव्यातील कालव्यांसाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात येणार असून गेल्या 10 दिवसात फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती झाली आहे. गोव्याकडे पाणी सोडण्यात आले असून त्याचा वेग कमी ठेवण्यात आला आहे. जास्त वेगाने पाणी सोडले तर आणखी काही तरी समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. म्हणून कमी वेगाने गोव्याला सोडलेले पाणी 24 ते 48 तासात बार्देशमध्ये पोहोचेल अशी माहिती शिरोडकर यांनी दिली. त्यामुळे बार्देशसह पर्वरीचा पाणी पुरवठा व पाणी प्रकल्प पुन्हा सुरळीत होईल आणि जनतेला होणारे त्रास दूर होतील, असे शिरोडकर यांनी नमूद केले.