Barchi Bahaddar Elephant: बर्चीबहाद्दर हत्तीने 55 वर्षांपूर्वी कोल्हापुरात उडवून दिला होता थरार, काय आहे घटना?
पाळीव हत्तीचा लळा आणि कोल्हापूरकर हा विषय पुन्हा एकदा ताजातवाना झाला
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हत्ती यांचे नाते खूप जुने आहे. जुना राजवाडा येथील नगारखान्याच्या इमारतीत बर्चीबहाद्दर नावाचा हत्ती कायम एका कमानीत रुबाबात झुलत होता. महापालिकेला देणगी म्हणून मिळालेला गजलक्ष्मी हा हत्ती रंकाळा चौपाटीवर वास्तव्य करून होता. जोतिबा डोंगरावर जोतिबाच्या नगारखान्यात एक हत्ती भक्तांच्या जणू स्वागतालाच उभा राहत होता.
यातील प्रत्येक हत्ती कायम चर्चेत राहिला आणि काल नांदणी येथे तर हत्तीच्या प्रेमापोटी ग्रामस्थांनी थेट विरोध करून त्याच्या स्थलांतराचा निर्णय काही काळ तरी रोखून धरला. या पार्श्वभूमीवर पाळीव हत्तीचा लळा आणि कोल्हापूरकर हा विषय पुन्हा एकदा ताजातवाना झाला.
कोल्हापुरात जुन्या राजवाड्याच्या कमानीत असलेल्या बर्चीबहाद्दर या हत्तीने 1970 साली म्हणजेच 55 वर्षांपूर्वीएक मोठा थरार कोल्हापुरात उडवून दिला होता. नांदणीच्या हत्तीच्या निमित्ताने हा थरार पुन्हा ताजातवाना झाला. कोल्हापुरात जुन्या राजवाड्याच्या कमानीत हा बर्ची बहाद्दर हत्ती बांधला जात होता.
कोल्हापूरच्या सर्व शाही सोहळ्यात हा बर्ची बहाद्दर नावाचा हत्ती आपले माणसाळलेले अस्तित्व दाखवायचा. 22 जून 1970 रोजी मात्र बर्ची बहादूर थोडा अस्वस्थ होता. पण या हत्तीचा माहुत बाबालाल महात आणि मुलगा वजीर यांनी त्याला फिरायला बाहेर काढले. नेहमी प्रमाणे हा हत्ती नगारखान्याच्या इमारतीतून निघाला.
एमएलजी हायस्कूलजवळून नगारखान्याकडे जात असताना अचानक चव्हाण वाड्याजवळ बाबालाल महात हत्तीवरून खाली पडला. मात्र, त्याचा वजीर नावाचा मुलगा हत्तीवरच राहिला. हा वजीर फक्त नऊ वर्षाचा होता. अस्वस्थ हत्ती पुन्हा पुन्हा राजवाड्याच्या नगारखान्याजवळ आला. मुख्य माहुत हत्तीवरून पडल्यानंतरही बर्ची बहाद्दर हत्ती जागेवर थांबला नाही.
तो पुन्हा नगारखान्याकडे आक्रमकपणे येत असल्याचे पाहून नगारखान्यातल्या दोन नोकरांनी भाले घेऊन हत्तीला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा परिणाम उलटा झाला. बर्ची बहाद्दर आपल्या कमानीत न जाता शेजारच्या मुख्य कमानीतून भाऊसिंगजी रोडवर पळत सुटला. हत्तीचे आज काहीतरी बिनसले आहे, याचा अंदाज आल्याने या दोन नोकरांनी लोकांना गोळा केले आणि ते सर्वजण बर्ची बहाद्दरच्या पाठोपाठ जाऊ लागले.
काहींनी पुढे जाऊन त्यास मागे हुसकावण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हत्ती पिसाळला, अशी अफवा कोल्हापुरात पसरली आणि प्रत्येक जण कुतूहलापोटी राजवाड्याच्या दिशेने येऊ लागला. हत्तीच्या मागे आरडाओरड करत लोकांची झुंडच लागली. पण, हत्तीने कोणाचीही दखल न घेता तो शिवाजी पुतळ्यापर्यंत आला.
तेथून चप्पल मार्केट लाईनच्या बाजूने पापाची तिकटी येथे आला तिथून पुन्हा महाद्वार रोडवर वळला. बुलबुले यांच्या टोप्याच्या दुकानाजवळ टेलिफोनचा खांब सोंडेने वाकवला.दोन रिक्षा उलथवून टाकल्या आणि कसबा गेटच्या रस्त्यावरून तो गंगावेशकडे वळला.
गंगावेशीत एक सायकल त्याने सोंडेने फेकून दिली. तेथून हत्ती साकोली कॉर्नर येथे आला व त्याने एका थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. या वेळपर्यंत हत्ती पिसाळल्याची अफवा शहरभर पसरलीच होती. शहरातले सर्व व्यवहार पटापट बंद झाले आणि पिसाळलेला हत्ती पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येऊ लागले.
काही धाडसी आणि उत्साही लोक हत्तीच्या पुढे काही अंतरावर जाऊन त्यास माघारी हाकलू लागले. पण, हत्तीने कोणालाही दाद दिली नाही. हतीवर बसलेला वजीर घाबरून गेला होता. पण, तो हत्तीच्या गळ्यातील घंटेच्या साखळीला घट्ट पकडून बसला होता. त्यामुळे हत्तीला रोखण्याबरोबरच त्यावर बसलेल्या वजीरला खाली कसे उतरून घ्यायचे, असा प्रश्न पोलीस आणि लोकांना पडला होता.
त्याला हत्तीवरून खाली घेण्यासाठी लोकांनी दोन्ही बाजूच्या इमारतीतून आडवा दोर लावून वजीरला या दोराला पकडून खाली उतर अशा सूचना केली होती. पण, वजीरला ते शक्य होईना. धोत्री तिकटीजवळ तर हत्तीने आपल्या सोंडेने आडवा बांधलेला दोरच तोडून दिला आणि त्याचवेळी हत्तीवरचा वजीर खाली पडून किरकोळ जखमी झाला.
हत्तीच्या मागे पुढे असलेली लोकांची झुंड कमी करण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करू लागले. त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री निवासन होते. अतिशय कठीण परिस्थितीत कोल्हापुरातील 100 हून अधिक पैलवान मदतीला आले. त्यांचे नेतृत्व हिंदकेसरी गणपतराव आंदळकर करत होते.
शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव घोलपे व पोलिसांनी हत्तीला काबूत आणण्याची एक योजना आखली. तत्पूर्वी काट्यांचे तडाखे देत पोलिसांनी लोकांची झुंड हटवली. हत्ती पुढे गवत, केळीचे घड टाकत त्यास गंगावेश पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोड मार्गे पुन्हा भवानी मंडपात आणले.
पायात चिमटा घुसवून केले जखमी
हत्ती भवानी मंडपात आला तरी तो आपल्या कमानीत जायला तयार नव्हता. त्यामुळे भवानी मंडपाच्या चारही दिशेला असलेल्या रस्त्यावर ट्रक, रोड रोलर लावून हत्ती भवानी मंडपापुरता रोखला गेला. पण, सायंकाळी सात वाजता हत्तीने आपल्या ताकतीने रस्त्यावर आडवा लावलेला रोड रोलर ढकलून आपला रस्ता खुला करून घेतला. तो बिनखांबी गणेश मंदिर मार्गे महाद्वार रोड ,कसबा गेट, शाहू उद्यान, तेली गल्ली, बुरुड गल्ली, टाऊन हॉलमार्गे जैन बोर्डिंगच्या आवारात घुसला.
त्यानंतर तेथून बाहेर पडून सत्यवादी भवनासमोर तासभर एकाच जागी थांबला. यावेळी दीपावलीत प्रकाशमान होणाऱ्या कुंड्या लावून हत्तीला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या दिशेला हुसकावण्याचा प्रयत्न झाला. गोंधळलेल्या हत्तीच्या पायात चिमटा घुसवून त्याला जखमी करण्यात आले. त्यामुळे हत्ती हळूहळू जुन्या राजवाड्यापर्यंत आला.
25 ते 30 हजार कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा
दरम्यान, शहरात जिल्हाधिकारी श्रीनिवासन यांनी 144 कलम जारी केले. रात्रभर हत्ती भवानी मंडपातल्या मोकळ्या जागेतच उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी माहूत बाबालाल यांना जखमी अवस्थेत राजवाडा चौकात आणले गेले व तेथे बाबालाल व वजीर यांनी केळीच्या घडाचे आमिष दाखवत दाखवत हत्तीला कमानीपर्यंत नेले. व तेथे त्याला साखळीने जेरबंद करण्यात आले.
या घटनेनंतर मात्र बर्ची बहाद्दरच्या पायात जेथे चिमटा लावला होता तेथील जखम बळावली आणि त्याने अंगच टाकले. तो कित्येक दिवस आजारी अवस्थेत पडून राहिला. 9 ऑगस्ट 1971 रोजी बर्चीबहाद्दरने अखेरचा श्वास घेतला. बर्ची बहाद्दर या आपल्या लाडक्या हत्तीची अंत्ययात्रा 25 ते 30 हजार कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत निघाली. बर्चीबहातर हत्तीला कळंबा तलावाजवळ मोठा खड्डा काढून पुरण्यात आले. पण बर्चबहाद्दर या हत्तीचे अस्तित्व कायम कोल्हापूरकरांच्या ध्यानात राहिले .