बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र - गोवाची निवडणूक शांततेत
सिंधुदुर्गातून ॲड. संग्राम देसाई एकमेव उमेदवार ; जिल्ह्यात ७ केंद्रांवर मतदान ; सिंधुदुर्गात 1200 वकील मतदार
सावंतवाडी : प्रतिनिधी
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची सन 2026 ची निवडणूक आज जवळपास सात केंद्रांवर शांततेत पार पडली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ले कुडाळ ,ओरोस ,मालवण , देवगड , कणकवली येथील न्यायालयात वकील संघटनेच्या कक्षात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसिद्ध वकील तथा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई हे एकमेव उमेदवार रिंगणात आहेत. तर महाराष्ट्र व गोवा येथून 159 उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. जवळपास २ लाख ७० हजार एवढी मतदारसंख्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1200 वकील मतदार आहेत.एकूण 25 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी 23 सदस्य निवडून द्यायचे आहेत. दोन सदस्य हे महाराष्ट्र व गोवा महा अधिवक्ताचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतील तर 23 सदस्यांसाठी 159 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी १८ पुरुष व ५ महिला सदस्यांसाठी मतदान होणार आहे. मतदान प्रणाली पसंती क्रमांकानुसार ,मतदानासह एकल हस्तांतरणीय मत असणार आहे. किमान पाच पसंती क्रमांक चिन्हांकित करणे आवश्यक आहे. पाच पेक्षा कमी पसंती क्रम चिन्हांकित केल्यास मतपत्रिकाअवैध ठरणार आहे .पहिल्या पसंतीचे मत सर्वात महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग ,वैभववाडी या दोन ठिकाणी मतदान केंद्र नसून जिल्ह्यात सात ठिकाणी मतदान पार पडले. वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. परिमल नाईक व ॲड. उमेश सावंत व सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी सर्वत्र शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया होत आहे असे स्पष्ट केले. आतापर्यंत जवळपास 80 टक्के मतदान झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव उमेदवार ॲड संग्राम देसाई आहेत.