Kolhapur News : सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा बार असोसिएशनच्यावतीने निषेध
मंगळवारी न्यायालयीन कामकाजापासून वकील अलिप्त
कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. मंगळवारी दिवसभर न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहत वकीलांनी या घटनेचा निषेध नोंदविला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी राकेश किशोर या वकीलावर न्यायालयाच्या अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशा प्रवृत्तीचा निषेध करण्याचे ठराव सभेत मंजूर केले.
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने बुट फेकण्याचा प्रयत्न केला. या विरोधात मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना
निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. सभेचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांनी हल्ल्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर याच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करणार असल्याचे जाहीर केले. सभेमध्ये संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी अशा प्रवृत्तीविरोधात 'अॅक्शन कमिटी' नेमण्याची मागणी वकिलांतून पुढे आली. या कमिटीच्या अध्यक्षस्थानी सर्वानुमते माजी न्यायाधीश तानाजी नलवडे यांची नेमणूक करण्यात आली.
यावेळी अॅड. महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस, अजित मोहिते, समीउल्ला पाटील, किरण पाटील, पिराजी भावके, पी. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, रणजीत गावडे, सर्जेराव खोत, शिवाजीराव राणे, कल्पना माने, राजेंद्र मंडलिक यांच्यासह वकिलांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्य सरकारी वकील विवेक शुक्ल, सचिव मनोज पाटील, सहसचिव सुरज भोसले, महिला प्रतिनिधी मनिषा सातपुते आदी व्यासपीठावर होत्या. उपाध्यक्ष पी.एस. पाडेकर यांनी आभार मानले.