भक्ताच्या योगक्षेमाची काळजी बाप्पा घेत असतात
अध्याय नववा
बाप्पा म्हणाले, माझ्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करणारे तसेच अनन्यतेने मला भजणारे भक्त मला आवडतात. निर्गुण उपासना करणारे भक्त इंद्रिये आपल्या ताब्यात घेऊन, सर्व भूतांचे हित करीत असतात व माझ्या शिकवणुकीनुसार चालत असतात. ह्या अर्थाचे यो मां मूर्तिधरं भक्त्यामद्भक्तऽ परिसेवते । स मे मान्योऽ नन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ।। 3 ।। खगणं स्ववशं कृत्वाखिलभूतहितार्थकृत् ।ध्येयमक्षरमव्यत्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ।। 4 ।। सोऽपि मामेत्यनिर्देश्यं मत्परो य उपासते । संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ।। 5।। हे श्लोक आपण अभ्यासत आहोत.
जे निर्गुण उपासना करतात त्यांच्या मनात संसाराविषयी नावड उपजतच निर्माण झालेली असते. त्यामुळे ते प्रथम पासूनच उपासनेच्यामागे असतात. त्यामागे त्यांनी पूर्वजन्मी केलेल्या सगुणोपासनेचे पुण्य उभे असते. म्हणून माणसाने भक्तीची सुरवात सगुणोपासनेने करावी. सगुणोपासनेत आपल्या आवडीच्या दैवताची सर्वांगसुंदर मूर्ती डोळ्यासमोर उभी असते. तिला साग्रसंगीत अलंकार घातलेले असतात. तिची षोडशोपचारे पूजा केलेली असल्याने ती अधिकच मनमोहक दिसत असते. साहजिकच अशी मूर्ती बघितली की, भक्ताची मूर्तीशी एकतानता होते. त्याचे अष्ट सात्विक भाव दाटून येतात. सगुणोपासनेतून त्याला ईश्वराशिवाय इतर गोष्टी गौण वाटू लागतात. संसारातून काहीच साध्य करायचे नसल्याने ते कर्तव्य करण्यापूरतेच संसारात वावरत असतात. त्यांना संसारापासून कोणतीच अपेक्षा नसते. अशी सगुणोपासना अनेक वर्षे केल्यावर भक्ताला हळूहळू ईश्वराची मूर्ती समोर दिसत नसली, तरी त्याची सर्वत्र असलेली उपस्थिती जाणवू लागते. सर्व चेतन अचेतन वस्तुतील ईश्वराचे अस्तित्व ध्यानात येऊ लागते.
श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याची संसार सुखाची आवड अद्याप संपलेली नाही अशा माणसाने संसारातील कर्तव्ये निरपेक्षतेने बजावत देवाच्या सगुण भक्तीला सुरवात करावी. हळूहळू त्याला देवभक्तीची गोडी वाटू लागेल. जसजशी देवभक्ती आवडू लागेल तसतसे त्याचे संसारातील प्रलोभनाचे आकर्षण आपोआप कमी होईल. देव हाच आपला त्राता असून आपल्या भल्याची आपल्या आईवडिलांप्रमाणे तो काळजी घेत आहे ह्याचा त्याला प्रत्यय येऊ लागेल. संसाराबद्दल त्याला वाटत असलेली काळजी हळूहळू कमी होत जाईल कारण आपल्या संसाराची जबाबदारी आता ईश्वराने घेतलेली आहे अशी त्यांची खात्री होत जाईल आणि तो निर्धास्तपणे देवभक्ती करू लागेल. असे भक्त संसारात वावरत असतात पण फक्त कर्तव्य करण्यापूरतेच, कारण त्यांना त्यातून काहीच साध्य करायचे नसते, त्यांना त्यापासून काहीच अपेक्षा नसते. अशी सगुणोपासना अनेक वर्षे केल्यावर भक्ताला हळूहळू समोर ईश्वराची मूर्ती समोर दिसत नसली, तरी त्याची सर्वत्र असलेली उपस्थिती जाणवू लागते. सर्व चेतन अचेतन वस्तुतील ईश्वराचे अस्तित्व ध्यानात येऊ लागते आणि त्याची निर्गुणोपासना सुरू होते.
निर्गुणोपासना करणाऱ्या भक्ताबद्दल बाप्पा म्हणतात, तो संपूर्ण माझ्या शिकवणुकीनुसार जीवनात वाटचाल करत असतो. दैनंदिन व्यवहार करताना ध्यानमग्न, अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापी, निर्विकार, शाश्वत व अनिर्देश्य अशा स्वरूपात मी त्याला सर्वत्र पहात असतो. माझ्या उपासनेत तो इतका मग्न होतो की, त्याला स्वत:च्या संसाराची काहीच तमा वाटत नसल्याने त्याच्या योगक्षेमाची काळजी मलाच करावी लागते. शेवटी मी त्याचा उद्धार करतो.
क्रमश: