बाप्पा भक्तीचे भुकेले आहेत
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, निरपेक्ष कर्म करणाऱ्यांना कुणाकडून कसलीच अपेक्षा नसल्याने ते इच्छा, भय, क्रोधरहीत असतात. त्यांची चित्तशुद्धी झालेली असते. त्यांना सर्वत्र ईश्वराचे दर्शन घडत असल्याने समोर दिसणाऱ्या सर्व व्यक्ती, प्राणी ही ईश्वराची रूपे दिसत असतात. त्यामुळे त्यांना कुणापासून भय वाटत नाही. जे आपल्याला मिळाले नाही ते इतरांना मिळाले ह्याबद्दल ते कुणाचा मत्सरही करत नाहीत. आपल्या नशिबात आहे ते आणि तेव्हढंच आपल्याला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात आलेला मनुष्य आपोआपच स्वस्थचित्त होतो. येथील सर्व वस्तू, व्यक्ती या नाशवंत आहेत. त्यामुळे त्या त्याच्या उपयोगाच्या नाहीत हे तो जाणून असतो. हे जाणणे आणि त्या जाणण्यावर ठाम राहणे याला विज्ञानरुपी तप असे म्हणतात. अशा तपोनिष्ठ व्यक्तीना ईश्वर त्यांच्यात सामावून घेतात. हे विश्व हेच माझं कुटूंब अशी इच्छाविरहित मनुष्याची अवस्था असते. निरपेक्ष भावनेनं जगात वावरणारा ईश्वराचा लाडका असल्याने मोक्षाचा अधिकारी होतो.
अर्थात इतर भक्तांच्याकडही मी दुर्लक्ष करत नाही. लोक ज्या ज्या भावनेने माझा आश्रय करतात त्या त्या प्रमाणे व्ययरहित मी त्यांना स्पष्ट फल देतो. ह्या अर्थाचा येन येन हि भावेन संसेवन्ते नरोत्तमा । तथा तथा फलं तेभ्य प्रयच्छाम्यव्यय स्फुटम् ।।15 ।। श्लोक आपण पहात आहोत. सदैव निरपेक्षतेनं जे भक्त कर्म करत असतात त्यांना बाप्पांच्याकडून मोक्षरूपी फळ मिळतंच मिळतं पण इतर जे सामान्य भक्त आहेत त्यांच्याकडेही बाप्पा दुर्लक्ष करत नाहीत. ज्याची जशी भावना असेल, जो मनात जी इच्छा धरून भक्ती करत असेल त्याला बाप्पा फळ देत असतात. बाप्पा भक्तीचे भुकेले आहेत. श्लोकात बाप्पा, ते स्वत: व्ययरहीत आहेत असं म्हणतात. याचा अर्थ असा की, बाप्पानी इतरांना कितीही दिलं तरी ते कायम परिपूर्ण असल्याने त्यांच्याकडच्या उपलब्धतेतलं काहीच कमी होत नाही. ज्याप्रमाणे समुद्रातल्या पाण्यातील घागरभर पाणी काढून घेतलं तर समुद्राला काहीच कमी पडत नाही म्हणून जे सकाम भक्ती करतात त्यांच्या अपेक्षा बाप्पा पुरवतात.
बाप्पांचं भक्तांवर फार प्रेम असतं. त्यामुळे ते हे समजून घेतात की, आज जरी भक्त, भक्तीच्या बदल्यात काहीतरी मिळावे म्हणून भक्ती करत असला तरी कालांतराने त्याच्या हे लक्षात येईल की, भक्तीच्या बदल्यात मिळणारी वस्तू कायम टिकणारी नसल्याने अशा वस्तू मागण्यात काही अर्थ नाही. ही बाब लक्षात आली की, भक्ती करण्याचे मूळ उद्दिष्ट त्याच्या लक्षात येईल आणि तो मुक्ती मिळण्यासाठी भक्ती करू लागेल. मुमुक्षु म्हणजे आपण करत असलेल्या कर्मातून निर्माण होणारे पापपुण्य आपल्या पुनर्जन्मास कारणीभूत होऊ शकेल ह्याची जाणीव झालेला भक्त होय. बाप्पा मुक्ती मिळावी या अपेक्षेने भक्ती करणाऱ्या मुमुक्षुना मार्ग दाखवतात. दु:खी, कष्टी, व्याकुळ, आर्त असे भक्त बाप्पाना शरण जाऊन आधीव्याधीतून मुक्त करा अशी प्रार्थना करतात. त्यांचे दु:ख बाप्पा निवारण करतात. साधू, संन्यासी, साधक इत्यादींना मोक्ष देतात. मोक्ष ही एक मानसिक अवस्था असून ती चालू जन्मात प्राप्त होऊ शकते. जे साधक मोक्षपदी आरूढ झालेले असतात, त्यांना आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान वाटत असते. अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असं त्यांना वाटत नसतं. ईश्वरी इच्छेनुसार आयुष्यात जे जे घडतंय ते त्यांना मान्य असतं आणि त्याचा ते ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकार करतात. वरील सर्व प्रकारचे भक्त बाप्पांना प्रिय असतात. भक्ती करणाऱ्याची जशी भावना असते त्याप्रमाणे बाप्पा त्याला फळ देतात कारण त्यांना माहीत असतं की, भक्ती करत करत एक ना एक दिवस त्यांना कळेल की, जीवनाचं सार्थक कशात आहे आणि त्यानंतर ते योग्य ती साधना करून त्यांच्यात विलीन होतील.