घरोघरी बाप्पा, मनामनात उत्सव!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याहून कोकणकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. रेल्वे स्थानकांवर उसळलेली गर्दी, विशेष गाड्यांमधील तुडुंब प्रवासी आणि एसटी बसस्थानकांवरील लगबग हे या प्रवासाचे चित्र असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्णत्वास गेले नसल्याने महामार्गावरील प्रवासही अनेकदा त्रासदायक ठरतो. ख•s, अपूर्ण कामे, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढलेला वेळ यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही ‘गणपतीला जायचेच’ या भावनेत कोणतीही कमी होत नाही, हे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीने लक्षात येते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात गणपती बाप्पाचा उत्सव कोकणात ज्या आत्मीयतेने, साधेपणाने आणि कौटुंबिक जिव्हाळ्याने साजरा होतो, त्याला वेगळीच ओळख आहे. शहरांतील भव्य मंडप, विद्युत रोषणाई आणि मोठमोठ्या सार्वजनिक उत्सवांपेक्षा कोकणात ‘घरचा गणपती’ हीच उत्सवाची खरी ओळख आहे. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव आता कोकणच्या गावागावांत, वाड्यावस्त्यांत आणि घराघरांत भक्ती, परंपरा आणि आपुलकीचा महासंगम ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखोंच्या संख्येने चाकरमानी मंडळी गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. अमाप उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याहून कोकणकडे येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. रेल्वे स्थानकांवर उसळलेली गर्दी, विशेष गाड्यांमधील तुडुंब प्रवासी आणि एसटी बसस्थानकांवरील लगबग हे या प्रवासाचे चित्र असते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अनेक ठिकाणी पूर्णत्वास गेले नसल्याने महामार्गावरील प्रवासही अनेकदा त्रासदायक ठरतो. ख•s, अपूर्ण कामे, वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढलेला वेळ यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही ‘गणपतीला जायचेच’ या भावनेत कोणतीही कमी होत नाही, हे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीने लक्षात येते.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिह्यांमध्ये मिळून दोन लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. यावरून कोकणातील गणेशोत्सवाची व्याप्ती आणि घराघरांतील श्रद्धेची ताकद स्पष्ट होते. मूर्तींच्या किमतीत यंदा महागाईमुळे वाढ झाली असली, तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. आपल्या घरातील बाप्पाची सजावट आकर्षक असावी आणि गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी प्रत्येक कुटुंबाने अतिशय भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.
अनेक कुटुंबे आजही शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा जपत आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना कोकणात रुजलेली नाही. तर प्रत्येक घरोघरी आणि एकाच घरातील विविध पिढ्यांनी एकत्र येऊन बाप्पाची सेवा करण्यापर्यंत कोकणातील उत्सवाची अनेक रुपे पाहायला मिळतात. म्हणूनच कामानिमित्त बाहेरगावी जाणारे लोक गणेशोत्सवासाठी गावी परतल्याने बंद असलेली घरे पुन्हा एकदा उघडतात. त्यामुळे गावात वाड्यावाड्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. या चाकरमान्यांसाठी यावर्षीही विशेष रेल्वे गाड्या व एसटी सोडण्यात आल्या होत्या.
गणेशोत्सव म्हटला की, जशी धार्मिक परंपरा आहे तशी खाद्य संस्कृतीचीसुद्धा परंपरा आहे. त्याचबरोबर कोकणातील गणेशोत्सवाची रात्र म्हणजे लोककला आणि भक्तीचा जागर. सिंधुदुर्गातील गावागावांत भजन मंडळांनी आधीच तयारी करून पेटी, पखवाज आणि टाळांच्या साथीने रात्री भजनं रंगू लागली आहेत. आरत्यांच्या स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. रत्नागिरी जिह्यातील पारंपरिक जाखडी नृत्य, शक्ती-तुरा आणि बाल्या नृत्य या लोककलांनाही गणेशोत्सवाच्या काळात विशेष रंग भरला आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल मनोरंजनाच्या युगातही या पारंपरिक कलांना मिळणारा प्रतिसाद ही कोकणच्या सांस्कृतिक मुळांची ताकद अधोरेखित झाली आहे.
गणेशोत्सवाचा परिणाम केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. मूर्तिकारापासून खाद्यपदार्थ करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनाच आर्थिक संधी मिळते. त्यामुळे गणेशोत्सव हा कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा सण ठरतो.
शाडूच्या मातीच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट, प्लास्टिकचा मर्यादित वापर, निर्माल्य संकलन आणि कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर याबाबत जनजागृती वाढत आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांकडून स्वच्छता आणि निर्माल्य संकलन मोहिमा राबवल्या जात आहेत. ‘बाप्पाची भक्ती आणि निसर्गाची भक्ती’ या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे जाणे हीच काळाची गरज आहे. कोकणचा निसर्ग आणि गणेशोत्सव यांचे नाते अतूट आहे. डोंगर, समुद्र, नद्या, खाड्या आणि हिरवाईने नटलेल्या या भूमीत उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवण्याची गरज अधिक आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील लोकसंख्येत मोठी वाढ होते. रेल्वे स्थानके, बसस्थानके, बाजारपेठा, महामार्ग आणि पर्यटनस्थळांवर गर्दी वाढते. त्यामुळे वाहतूक नियंत्रण, आरोग्य सुविधा, आपत्कालीन यंत्रणा, वीजपुरवठा आणि स्वच्छता या सर्वच यंत्रणांवर अतिरिक्त ताण येतो. पोलीस प्रशासनाकडून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त, गस्त आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवली गेली आहे. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन, ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण, महिलांची व ज्येष्ठांची सुरक्षितता आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवाचे दिवस संपतील. बाप्पाला निरोप दिला जाईल. चाकरमानी पुन्हा शहरांकडे परततील. वाड्या पुन्हा शांत होतील. मात्र या काही दिवसांत अनुभवलेला आनंद, कुटुंबीयांच्या भेटी, आरत्यांचे सूर, भजनांची रात्र, मोदकाचा सुगंध आणि बाप्पाच्या चरणी केलेली प्रार्थना वर्षभर मनात राहील. म्हणूनच कोकणातील गणेशोत्सवाची खरी ओळख भव्यतेत नाही, तर भावनेत आहे; गर्दीत नाही, तर घराघरातील आपुलकीत आहे; दिखाव्यात नाही, तर श्रद्धेत आहे.
संदीप गावडे