भक्ताच्या मागण्या बाप्पा आनंदाने पुरवतात
अध्याय सातवा
सुरवातीपासून ज्यांना समाधीमार्गाने जाऊन ईश्वराची उपासना करणं साधत नाही त्यांच्यासाठी बाप्पा पूजेचा मार्ग सांगतात. नित्यनेमाने पूजा केल्याने भक्ताची चित्तशुद्धी होत राहते. चित्तशुद्धी म्हणजे स्वभावातले रज तम गुण कमी होऊन सत्वगुणाची वाढ करणे. सर्वसाधारणपणे माणसात रज व तम गुण जास्ती व सत्वगुण त्यामानाने कमी असतात तेव्हा रज, तम गुणांचे प्राबल्य कमी करण्यासाठी सत्वगुणाची वाढ करणे हा उपाय सर्व धर्मग्रंथातून सांगितला आहे. ईश्वराच्या पूजेतून, ईश्वराच्या कृपेचा लाभ होतो व त्यातून सत्वगुणाची वाढ होत राहते. पूर्ण चित्तशुद्धी साधल्यावर त्याला समाधीमार्गाने पुढे जाऊन ईश्वराची उपासना करणे सोपे जाते. षोडशोपचारे पूजा, उपलब्ध असलेलं पान, फुल, फळ हे मनोभावे बाप्पांना अर्पण करून केलेली पूजा व मानसपूजा असे पूजेचे तीन प्रकार बाप्पांनी सांगितले. षोडशोपचारे पूजा करण्याला बरेच साहित्य लागते. तसेच वेळही भरपूर लागतो. साहित्यासाठी धनही गाठी असावे लागते. हे सगळ्यांनाच शक्य होते असे नाही म्हणून त्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी मानसपूजेचा उपाय बाप्पांनी सांगितलेला आहे. त्यामध्ये सर्व साहित्याची जुळवाजुळव व पूजाविधी मनातल्या मनात पार पडायचा असतो. पूजेच्या ह्या तीन प्रकारापैकी कोणत्या पद्धतीने पूजा करावी म्हणजे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील असा प्रश्न भक्तांना पडणे साहजिक आहे. त्याचं उत्तर म्हणून बाप्पा पुढील श्लोकात सांगतात, भक्त चारपैकी कुठल्याही आश्रमातला असो त्याने निरपेक्षतेनं कोणत्याही प्रकारे माझी पूजा केली तर त्याला सिद्धी मिळते.
ब्रह्मचारी गृहस्थो वा वानप्रस्थो यतिश्च यऽ ।
एकां पूजां प्रकुर्वाणोऽ प्यन्यो वा सिद्धिमृच्छति ।। 11 ।।
अर्थ- ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यति अथवा इतर कोणीही माझी एका प्रकारची पूजा केल्याने देखील सिद्धि पावतो.
विवरण-बाप्पांना त्यांना पूजणारे चारही आश्रमातील भक्त प्रिय आहेत. त्यातील काही भक्त मनात काही इच्छा ठेऊन त्यांची मनोभावे पूजा करतात. ज्याप्रमाणे लहान मुले अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईवडिलांच्याकडे हट्ट करतात आणि आईवडील ती कौतुकाने पुरवतात. मुलं लहान असल्याने त्यांच्या मागण्याही अगदी छोट्या म्हणजे भावली, फुगा, चॉकलेट अशा स्वरूपाच्या असतात. त्या मागण्यांच्या मनाने त्यांच्या आईवडिलांची आर्थिक शक्ती मोठी असते. त्याप्रमाणेच भक्तांच्या मागण्यांच्या मनाने बाप्पांची शक्ती अचाट असते. इतकी की, वेदही बाप्पांच्या अचाट शक्तीची कल्पना करण्याचा प्रयत्न करतात पण थोड्याच वेळात आपण बाप्पांच्या अफाट शक्तीची कल्पना करण्यास असमर्थ आहोत हे लक्षात आल्यावर नेति नेति असे म्हणून हात टेकतात. बाप्पाही त्यांच्या दृष्टीने किरकोळ असलेली भक्तांची मागणी, जर ती भक्तांच्या हिताची असेल तर नक्कीच पुरवतात. भक्तांची मागणी पुरवण्यामागे बाप्पांची तीन कारणे आहेत. पहिलं म्हणजे मागितलेली गोष्ट भक्ताच्या हिताची असते आणि दुसरं कारण म्हणजे भक्ताला पाहिजे ते मिळालं की, भक्ताचं बाप्पांवरील प्रेम आणखीन वाढतं आणि बाप्पा तर भक्तांच्या प्रेमाचे भुकेले आहेत. तिसरं कारण म्हणजे भक्ताने त्याच्या दृष्टीने कितीही महत्त्वाची मागणी केलेली असली तरी ती लौकिकातली म्हणजे प्रपंचाला उपयोगी असलेली मागणी असल्याने, मागितलेली वस्तू कधी ना कधीतरी नष्ट होणारी आहे हे त्यांच्या लक्षात यावं आणि कायमचं टिकणारं असं काही मागण्याची बुद्धी त्यांना व्हावी. या तीन कारणांसाठी बाप्पा भक्तांच्या हिताच्या कोणत्याही मागण्या पुरवायला तयार असतात.
क्रमश: