बाप्पा, दहावीत ९८ टक्के गुण मिळू दे ! 'मित्रांसोबतची दोस्तीही कायम टिकू दे'; विद्यार्थ्यांने लिहिले भावनिक पत्र
कोल्हापूर : 'बाप्पा, दहावीत ९८ टक्के गुण मिळू दे... अशी मनापासून इच्छा व्यक्त करणारे पत्र एका विद्यार्थ्याने चक्क बाप्पांना लिहले आहे. इराणी खण येथे विसर्जनासाठी आणलेल्या गणेशमूर्तीच्या हातात ठेवलेले सदरचे पत्र सापडले. हे पत्र कुतूहलचा विषय बनले असले तरी बाप्पांशी असलेले भावनिक नाते या पत्राच्या माध्यमातून अधोरेखित झाले. तसेच 'मित्रांसोबतची दोस्ती कायम टिकू दे, अशी भावनिक मागणीही या पत्राच्या माध्यमातून केली आहे. गणेश विसर्जनाच्या भक्तिमय वातावरणात भाविकांकडून बाप्पांकडे विविध मनोकामना व्यक्त केल्या जातात. पत्रद्वारे बाप्पांकडे केलेली मागणी इराणी खण परिसरात चर्चेचा विषय बनली होती.
दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे अभ्यास, चांगले गुण व भविष्यातील स्वप्नांबरोबरच मित्र- मैत्रिणींच्या आठवणीही या वयात तितक्याच महत्वाच्या असतात. याच भावविश्वाचे दर्शन या भावनिक पत्रातून घडले. दहावीच्या परीक्षेतील यशाची आस, मित्रांची साथ आणि बाप्पांवरील अढळ श्रद्धा या तीनही भावनांचा सुंदर संगम या छोट्याशा पत्राने पाहायला मिळाला. त्यामुळे इराणी खण येथील गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तिभावासोबतच एका विद्यार्थ्याच्या निरागस मनोकामनेनेही उपस्थितांचे लक वेधून घेतले.
बाप्पाकडे गुणासोबत मैत्रीचीही मागणी
'दहावीत ९८ टक्के गुण मिळू दे, ही विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा या पत्रातून दिसून येते. मात्र, केवळ शैक्षणिक यशाचीच अपेक्षा न ठेवता मित्रांसोबतची दोस्ती कायम राहावी, अशी मागणीही त्याने यावेळी बाप्पांकडे केली आहे. त्यामुळे या पत्रातून विद्यार्थ्याच्या निरागस भावना आणि बाप्पांवरील असलेला विश्वास अधोरेखित झाला आह.
बाप्पांशी भावनिक नाते
गणरायाला आपला जवळचा मित्र, मार्गदर्शक व संकट काळात धावून येणारा आधार मानले जाते, त्याच भावनेतून या विद्यार्थ्याने आपल्या मनातील इच्छा कागदावर उतरवून ती बाप्पांच्या चरणी अर्पण केली. विसर्जनाच्या गर्दीत मूर्तीच्या हातात ठेवलेले हे पत्र दिसताच उपस्थितांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली.