सगुणभक्ती बाप्पांना मान्य आहे
अध्याय नववा
वरेण्यराजा बाप्पांना विचारतोय की, तुला सगुणोपासना करणारा भक्त आवडतो की, निर्गुणोपासना करणारा तपस्वी आवडतो? मी निर्गुण उपासना करतो म्हणून ती होत नाही. त्यासाठी माणसाची मानसिकता तयार व्हावी लागते. त्यासाठी सुरवात सगुणभक्तीपासून करावी असे सर्व संत सांगतात. ईश्वराच्या सगुण रूपावर लक्ष केंद्रित करणे सहज शक्य असते. त्याउलट निर्गुण भक्तीत ईश्वराच्या विभूतींची पूजा करावी लागते आणि त्यासाठी सगुणोपासना पूर्ण व्हावी लागते. निरपेक्षतेने सगुणोपासना करणाऱ्या भक्ताला देव आपल्यातच आहे असा साक्षात्कार होतो. ईश्वराचं सर्वव्यापी स्वरूप भक्ताच्या लक्षात येऊ लागतं. आता त्याला उपासना करण्यासाठी सगुण साकार स्वरूपातल्या ईश्वराच्या मूर्तीची गरज भासत नाही. अर्थात अशी अनुभूती येण्याला बराच काळ सगुणोपासना करावी लागते आणि मग निर्गुणत्वाचा साक्षात्कार होऊ लागतो. तो झाल्यावर त्याला संसार असार वाटू लागतो, त्यातील मिथ्यत्व त्याच्या लक्षात येते. त्याचबरोबर त्याला सर्वव्यापी असलेल्या ईश्वराचे अस्तित्व सर्व वस्तू आणि व्यक्तीत जाणवू लागते. बाप्पा सर्वज्ञ, साक्षी आहेत हे राजाला माहित आहे म्हणून तो पुढील श्लोकात बाप्पाना विनंती करतोय,
असि त्वं सर्ववित्साक्षी
भूतभावन ईश्वरऽ
अतस्त्वां परिपृच्छामि वद मे कृपया विभो ।।2।।
अर्थ- तू सर्वज्ञ, साक्षी, भूतांचा उत्पन्नकर्ता व ईश्वर आहेस. म्हणून मी तुला विचारीत आहे. हे सर्वव्यापिन्, कृपा करून मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला सांग.
विवरण-एखाद्याची मर्जी राखायची असेल, त्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्याला जी गोष्ट आवडते ती करावी म्हणजे कार्यभाग लवकर सिद्ध होतो असा व्यवहारात सगळ्यांना येणारा नित्याचा अनुभव असतो. त्यानुसार बाप्पांना ज्या प्रकारची उपासना आवडते त्याप्रमाणे आपण उपासना करावी अशी माणसाची इच्छा जाणून वरेण्यराजा वरील प्रश्न विचारत आहे. त्यानं बाप्पांचं सर्वज्ञ, सर्वसाक्षी, भूतांचा उत्पन्नकर्ता, ईश्वर हे सत्यस्वरूप जाणलेलं आहे. तेच इतरांनाही समजावं म्हणून सर्वांच्या मनातला प्रश्न राजानं बाप्पांना विचारला आहे. प्रत्यक्ष बाप्पांच्याकडून उत्तर मिळालं की, भक्त नि:शंक मनाने उपासना करू लागेल असा उद्देश त्यामागे आहे. उपासना करून सर्व माणसं सुखी समाधानी व्हावीत, त्यांना मन:शांती लाभावी ह्या कळकळीनं राजानं बाप्पांना प्रश्न विचारला आहे. राजाची कळकळ ह्या शांतीमंत्रातून व्यक्त होते. सर्वे भवन्तु सुखिन: । सर्वे सन्तु निरामयाऽ। सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दु:ख भाग्भवेत्ऽ? शान्ति शान्ति शान्ति... सगळे सुखी होवो, सगळे रोगमुक्त राहो, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षिदार बनो, आणि कोणाच्या वाट्याला दु:ख ना येवो.
पुढील श्लोकात राजाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल बाप्पा म्हणाले, मला सगुण उपासना करणारा भक्त अधिक आवडतो.
यो मां मूर्तिधरं भक्त्यामद्भक्तऽ परिसेवते ।
स मे मान्योऽ नन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ।। 3 ।।
खगणं स्ववशं कृत्वाखिलभूतहितार्थकृत् ।
ध्येयमक्षरमव्यत्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ।। 4 ।।
सोऽपि मामेत्यनिर्देश्यं मत्परो य उपासते ।
संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ।। 5।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, भक्तिपूर्वक माझ्या मूर्तीची उपासना करणारा भक्त मला मान्य आहे. माझ्याशी अनन्य होऊन, इंद्रियसमुदाय आपल्या ताब्यात घेऊन, सर्व भूतांचे हित करणारा, मत्पर होत्साता ध्यानमग्न, अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापी, कूटस्थ, निर्विकार, शाश्वत व अनिर्देश्य अशा माझी उपासना करणारा देखील मजप्रत येतो. या संसारसागरापासून त्यालाही मी तारतो.
क्रमश: