सावंतवाडीत पुन्हा झळकला धार्मिक ध्रुवीकरण वाढवणारा बॅनर
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण वाढवणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमध्ये नागरिकांना धर्म आणि नाव विचारूनच खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बॅनरवर असा मजकूर आहे की, "दहशतवाद असाच संपवावा लागतो ! ४०० वर्षांपूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले, आणि आज ही.... २७ लोकांना धर्म विचारुनच मारले.... काहीच बदलले नाही.... म्हणून तुम्ही किमान धर्म, नाव विचारुनच खरेदी करा. १००% हिंदूंकडूनच खरेदी करा." असे आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या बॅनरवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच, सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांचा उल्लेख आहे. सावंतवाडी शहरात यापूर्वीही अशा प्रकारचे बॅनर लागले होते ते नगरपरिषदने परवानगी नसल्याने हटवले होते आणि आता पुन्हा तेच बॅनर शहरात दिसल्यामुळे सामाजिक स्तरावर याची चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरमधील मजकूर एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत आहेत.