धामणे येथील बनकुडी तलाव ओव्हरफ्लो
अवचारहट्टी येथील धरण तुडुंब
वार्ताहर /धामणे
सतत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अवचारहट्टी धरण आणि धामणे येथील बनकुडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यंदा दमदार पाऊस सुरू असल्याने सर्वच तलाव, नदी, नाले व शिवारात पाणी भरले असले तरी नाले फुटून किंवा तलाव फुटून धामणे, बस्तवाड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, देसूर, सुळगा(ये) या भागात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांबद्दल आतापर्यंत तरी म्हणावी तशी चिंता करावी लागली नसल्याचे मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या भागातील सर्वच शेतकरी आपापल्या शेतातील पिकामध्ये मशागतीच्या कामात मग्न झाल्याचे दिसत आहे. यंदा या भागातील भात पिकांना पोषक असे दमदार पावसामुळे सध्यातरी वातावरण दिसत आहे.
जुने बेळगावातील पिके पाण्याखाली
एकसारखा पाऊस पडत असल्याने बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे जुने बेळगाव, वडगाव, शहापूर शिवारातील भातपीक पाण्याखाली आल्यामुळे जुनेबेळगाव, वडगाव व शहापूर शिवारातील शेतकऱ्यांचे शेकडो एकर जमिनीतील भातपीक धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. शासनाच्या नाकर्तेपणामुळे बळ्ळारी नाल्याच्या खोदाईचे काम झालेले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे बळ्ळारी नाल्याच्या खोदाईबाबत तक्रार करून देखील शासनाने या समस्येकडे साफ दुर्लक्ष केल्याने बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. निदान आता तरी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: बळ्ळारी नाल्याच्या पुराची पाहणी करावी, अशी मागणी जुनेबेळगाव, वडगाव, शहापूर शिवारातील शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे.