बँका, पोस्ट, वाहतूक सेवा प्रभावित
कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद : कोलकाता-भुवनेश्वरमध्ये रेल्वे रोखण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विविध कामगार संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला बुधवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांश राज्यांमध्ये अनेक ठिकाणी बँका, विमा, पोस्ट आणि सार्वजनिक वाहतूक यासारख्या सेवा प्रभावित झालेल्या दिसून आल्या. 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी संपाची हाक दिली होती. देशभरात 25 कोटी कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा ‘युनियन’कडून करण्यात आला.
ट्रेड युनियन खाजगीकरण आणि 4 नवीन कामगार संहितांच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती. कमीत कमी मासिक वेतन 26,000 रुपये आणि जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची मागणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केली होती. अनेक कामगार संघटनांनी केंद्राच्या धोरणांना विरोध दर्शवत संपात सहभागी होणे पसंद केले. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग, टपाल सेवा आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यासारख्या सेवांवर परिणाम झालेला दिसून आला.
बिहार, ओडिशा आणि बंगालमध्ये निदर्शकांनी रेल्वेमार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. बिहारमधील जहानाबाद रेल्वेस्थानकावर रेल्वेसमोर आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये, निदर्शकांनी जाधवपूरसह अनेक स्थानकांवर रेल्वेसेवा विस्कळीत केल्या. डाव्या संघटनांच्या सदस्यांनी पोलिसांसमोर रुळांवर धरणे धरले होते.
ओडिशात महामार्ग रोखण्यात आले. तर केरळमध्ये दुकाने बंद राहिली. ओडिशातील भुवनेश्वरमध्ये सीआयटीयू सदस्यांनी राष्ट्रीय महामार्गही रोखला. केरळमधील कोट्टायममध्ये दुकाने आणि मॉल बंद राहिले. व्यापाऱ्यांनी कामगार संघटनांच्या बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला. तामिळनाडूच्या काही भागात सेवा सामान्य राहिल्या. ‘भारत बंद’मुळे चेन्नईमधील सार्वजनिक वाहतूक सेवांवर फारसा परिणाम झाला नाही. येथील बसेस सामान्यपणे धावत राहिल्या. अन्य राज्यांमध्येही राज्य परिवहन सेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही.
संयुक्त किसान मोर्चाचा पाठिंबा
संयुक्त किसान मोर्चा आणि नरेगा संघर्ष मोर्चासारख्या प्रादेशिक संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिला होता. तथापि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न भारतीय मजदूर संघाने या संपात सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. हा संप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे त्यांनी म्हटले होते.