रविवारी बँका सुरू; प्रतिसाद नाही
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा सोमवारपासून तीन दिवस संप आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे बेळगावमध्ये रविवारी सर्व राष्ट्रीयीकृत बँका नियमित वेळेप्रमाणे सुरू होत्या. परंतु नागरिकांचा तितकासा प्रतिसाद नसल्याचे दिसून आले.
आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस संप होणार आहे. चौथा शनिवार, त्यानंतर रविवारी आलेली साप्ताहिक सुटी व सलग तीन दिवस संप असे एकूण पाच दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार होते. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार होती.
नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी 10 वाजता सर्व बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु बँकांमध्ये ठराविकच नागरिकांनी व्यवहारांसाठी हजेरी लावली होती. त्यामुळे बऱ्याच बँकांमध्ये रविवारी शुकशुकाट दिसून आला.