Vidhansabha Election तीन राज्यात विधानसभा पोटनिवडणुका जाहीर बिहार, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये तीन जागांसाठी मतदान
► वृत्तसंस्था
नवी दिल्ली
भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशातील दातिया आणि गुजरातमधील मांजलपूर विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या. विविध कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी 30 जुलै रोजी मतदान होणार असून 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच संबंधित क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.
भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमधील बांकीपूरची जागा रिक्त झाली आहे. राजेंद्र भारती यांच्या अपात्रतेमुळे मध्य प्रदेशातील दातियाची जागा रिक्त झाली आहे, तर आमदार योगेशभाई पटेल यांच्या निधनामुळे गुजरातमधील मांजलपूरची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 6 जुलै रोजी अधिसूचना जारी केली जाईल.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 13 जुलै आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 14 जुलै रोजी होईल आणि उमेदवारांना 16 जुलैपर्यंत आपली उमेदवारी मागे घेता येईल. या जागांसाठी 30 जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 3 ऑगस्ट रोजी होईल. तिन्ही मतदारसंघांमधील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 4 ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल.