बँकिंग, मेटलमुळे शेअरबाजारात घसरण
सेन्सेक्स 297 अंकांनी घसरला : टेक महिंद्रा चमकला
मुंबई :
बँकिंग आणि मेटल समभागाच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार मंगळवारी दुसऱ्या दिवशी घसरणीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 297 अंकांनी घसरणीत राहिला होता. मॅक्स हेल्थकेअर, टेक महिंद्रा यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले तर टाटा स्टील आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 297 अंकांनी घसरत 82029 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 81 अंकांनी घसरणीसोबत 25145 अंकांवर बंद झाला. या सोबतच निफ्टी बँक निर्देशांकसुद्धा नुकसानीसोबत 56496 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग हे घसरणीसोबत तर 4 समभाग तेजीसह बंद झाले.
निर्देशांकांचा विचार करता, माध्यम, धातू, बँकिंग आणि कंझ्युमर ड्युरेबल यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. टाटा मोटर्सच्या खराब कामगिरीचा फटका शेअर बाजाराला मंगळवारी अनुभवायला मिळाला. तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत गुंतवणूकदार मात्र सावध राहिलेले पाहायला मिळाले.
हे समभाग घसरणीत
सेन्सेक्समध्ये पाहता बजाज फायनान्स, ट्रेंट लिमिटेड, टाटा स्टील, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टीसीएस, एनटीपीसी, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीत होते. यासोबत इन्फोसिस, कोल इंडिया, इटर्नल, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया, आयशर मोटर्स, मारुती सुझुकी यांचे समभाग घसरणीत राहिले होते.
हे समभाग तेजीत
दुसरीकडे मॅक्स हेल्थकेअर, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय लाइफ, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल, टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, टायटन आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग मात्र तेजीसमवेत बंद झाले होते. निफ्टी पीएसयु बँकेचा निर्देशांक सर्वाधिक 1.52 टक्के घसरणीत राहिला.