For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँकिंग, आयटी समभागांमुळे बाजारात तेजी

06:05 AM Dec 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
बँकिंग  आयटी समभागांमुळे बाजारात तेजी
Advertisement

सेन्सेक्स 110अंकांनी वधारला : एचडीएफसी लाइफचे समभाग तेजीत

Advertisement

मुंबई : सलग चौथ्या सत्रात बुधवारी शेअर बाजारात तेजीची झुळूक कायम राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 110 अंकांनी वाढीसोबत बंद झाला असून बँकिंग आणि आयटी समभागांनी शेअरबाजाराला बुधवारी आधार देण्याचे काम केले. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 110 अंकांच्या वाढीसोबत 80,956 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 10 अंकांच्या तेजीसोबत 24,467 च्या स्तरावर बंद झाला होता. बँकिंग आणि आयटी कंपन्यांच्या समभागांनी चांगली तेजी राखली होती, परिणामी शेअरबाजार काहीसा सावरत व्यवहार करत राहिला. दिवसभरात बाजारात चढ उतार दिसून आला. निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक मात्र घसरणीत राहिले होते. विविध समभागांची कामगिरी पाहिल्यास एचडीएफसी लाइफचे समभाग सर्वाधिक 2.57 टक्के वाढत 650 रुपयांवर बंद झाले. यासोबत एचडीएफसी बँक 1.86 टक्के वाढत 1860 रुपयांवर, अपोलो हॉस्पिटलचे 1.49 टक्के वाढत 7232 रुपयांवर, एनटीपीसीचे समभाग 1.45 टक्के वाढत 372 च्या स्तरावर बंद झाले होते. बजाज फिनसर्व्ह 1.31 टक्के वाढत 1628 रुपयांवर बंद झाला आहे.

हे समभाग घसरणीत..

Advertisement

दुसरीकडे दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक 2.25 टक्के घसरत 1584 रुपयांवर स्थिरावलेले दिसले. तर सिप्ला 2.16 टक्के घसरत 1501 रुपयांवर, बजाज ऑटोचे समभाग 1.78 टक्के घटत 8999 रुपयांवर बंद झाले होते. तसेच टाटा मोटर्सचे समभाग 1.65 टक्के कमी होत 788 च्या स्तरावर कार्यरत होते. अदानी पोर्टसचे 1.49 टक्के, पॉवरग्रिड कॉर्पचे समभागही 1.40 टक्के इतके घसरलेले दिसले. दिवसभरात सत्रात पाहायला गेल्यास बँकिंग समभागांनी दमदार कामगिरी नोंदवली. पीएसयू बँक निर्देशांक 2.25 टक्के वाढत 7134 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी 1.08 टक्के मजबूत होत 53,267 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक 0.44 टक्के वाढीसोबत 43,949 वर बंद झाला. ऑटो निर्देशांक मात्र 0.71 टक्के घसरणीत तर एफएमसीजी निर्देशांक 0.73 टक्के कमकुवत दिसून आला.

Advertisement
Tags :

.