For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतिम सत्रात बँकिंग-आर्थिक क्षेत्राने बाजाराला सावरले

06:32 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतिम सत्रात बँकिंग आर्थिक क्षेत्राने बाजाराला सावरले
Advertisement

सेन्सेक्स 231 तर निफ्टी 64 अंकांनी वधारले : डॉलरच्या तुलनेत रुपयाची सकारात्मक कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय शेअर बाजार शुक्रवारच्या सत्रात तेजीसह बंद झाले. रुपयाच्या मजबुतीमुळे आणि बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीमुळे देशांतर्गत बाजारांना आधार मिळाला. भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. दिवसाच्या व्यवहारात, रुपया 51 पैशांनी वधारून 95.69 चा इंट्राडे उच्चांक गाठला. तथापि, व्यवहार बंद होताना तो प्रति डॉलर 96.20 वर बंद झाला. याचाही परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

Advertisement

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 231.99 अंकांनी वधारुन निर्देशांक 75,415.35 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64.60 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 23,719.30 वर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये, ट्रेंट, श्रीराम फायनान्स आणि अॅक्सिस बँक यांसारखे शेअर्स सर्वाधिक वाढीसह प्रमुख वाढ नोंदवणाऱ्यांमध्ये होते.

क्षेत्रीय निर्देशांकांचा कल

क्षेत्रीय स्तरावर, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि निफ्टी बँक यांनी उत्कृष्ट कामगिरी करून बाजाराला बळकटी दिली. दुसरीकडे, निफ्टी फार्मा, निफ्टी हेल्थकेअर आणि निफ्टी मीडियामध्ये कमजोरी नोंदवली गेली.

तांत्रिक स्तरावर काय संकेत आहेत?

तज्ञांच्या मते, निफ्टीने पुन्हा एकदा 20-दिवसांच्या ईएमए (एक्सपोनेंशियल मूव्हिंग अॅव्हरेज) च्या वर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पातळीवर तीव्र प्रतिकार दिसून आला आणि निर्देशांक किंचित फरकाने त्याखाली बंद झाला. गेल्या नऊ ट्रेडिंग सत्रांपासून निफ्टी 23,860 ते 23,263 च्या रेंजमध्ये स्थिर (कन्सॉलिडेट) झाला आहे.

मोठ्या तेजीसाठी जागतिक स्थिरतेची गरज: तज्ञ

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजार किंचित सकारात्मक ट्रेंडसह व्यवहार करत असल्याचे दिसते. कमी पातळीवर होणारी खरेदी आणि जागतिक स्तरावर मिळत असलेल्या काही सकारात्मक संकेतांमुळे बाजाराला आधार मिळत आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांच्या भावनांमध्येही किंचित सुधारणा झाली आहे.

ते म्हणाले की, जागतिक स्तरावर एआय गुंतवणुकीची संकल्पना बाजारासाठी एक प्रमुख आकर्षण राहिली आहे. त्याच वेळी, देशांतर्गत बाजारात, वित्तीय क्षेत्रातील शेअर्सनी तेजीचे नेतृत्व केले, तर ऑटो आणि ग्राहक क्षेत्रांमध्येही निवडक खरेदी दिसून आली.

Advertisement
Tags :

.