बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाधिकाऱ्यांना आचरा ग्रामस्थांचा घेराव
KYC ची प्रकरणे ठेवली दीड महिना रखडून ; लाडकी बहीण योजनेपासून महिला राहिल्या वंचित
आचरा प्रतिनिधी
आचरा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकमध्ये खातेदार असलेल्या अनेक महिलांनी KYC साठी दिलेली अनेक प्रकरणे गेले दीड महिना रखडून ठेवली गेली. खातेदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही गेले दीड महिना अनेक महिलांची प्रकारणे रखडून ठेवल्याने खातेदार महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचीत राहिल्या. त्याचा भडका आज आचरा येथे उडाला. आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शाखेला धडक देत शाखा व्यवस्थापकाला घेराव घालत जाब विचारला. यावेळी उपस्थित जेष्ठ, महिलांनी शाखेतील कर्मचारी, शाखा व्यवस्थापक यांच्या कारभाराचा पाढाच वाचला यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 2 तास घेराव घालून ठेवला होता अखेर येत्या 10 दिवसात सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी घेराव मागे घेत येत्या 10 दिवसात सर्व प्रकारणे मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस यांच्या समवेत
चिंदरचे माजी सरपंच संतोष कोदे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर फ्रफुल्ल नलावडे, जयप्रकाश परुळेकर, रुपेश हडकर, सिद्धार्थ कोळगे, किशोर आचरेकर,सुनील दुखंडे, गणेश गोगटे, गणेश सावंत, प्रसाद आचरेकर, सुनील आचरेकर, विकास कवले तसेच आचरा, चिंदर त्रिबंक गावातील ग्रामस्थ खातेदार महिला उपस्थित होत्या.
अनेक महिला राहिल्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित
आचरा पंचक्रोशीत बहुसंख्य शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या महिलांची खाती ही बँक ऑफ महाराष्ट्र आहेत. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर यातील महिलांनी KYC करण्यासाठी लागणारा अर्ज व कागदपत्रे बँकेत जमा केली होती. मात्र, शाखेकडून वेगवेगळ्या मुदती दिल्या गेल्या. त्यासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागत होते. दीड महिना उलटूनही या महिलांना अजूनही kyc करून दिली गेली नसल्याचा प्रकार पुढे आला आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभापासून या सर्व महिला वंचित राहिल्या आहेत.
वयोवृद्ध महिलांनी वाचला कारभाराचा पाढा
बँक शाखाधिकारी यांना घेराव घातल्यानंतर वयोवृद्ध जेष्ठ महिलांनी कारभाराचा पाढाच वाचला. त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर त्या योजनेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही आडवली, पळसंब, त्रिंबक चिंदर वायंगणी गावातून येतो बँक 10 वाजता उघडते . आम्ही नऊ वाजल्यापासून बसून असतो. तासनतास आम्हाला बसून ठेवले जाते. दुपारी जेवणाची सुट्टी झाली की सांगितले जाते तुमचे काम झाले नाही चार दिवसांनी यावे. असे आम्ही गेले दीड महिना येतोय. हे कर्मचारी अधिकारी आम्हाला दाद देत नाहीत. उडवाउडवी केली जाते. आपल्या भावना व्यक्त करताना या महिलांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी ग्रामस्थ , नागरिकांनी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना चांगलेच धारेवर धरले होते.