बँक ऑफ इंडिया दोडामार्ग शाखा रत्नागिरी झोनमधून प्रथम
दोडामार्ग – वार्ताहर, छाया – समीर ठाकूर
बँक ऑफ इंडियाच्या कसई – दोडामार्ग शाखेचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी झोन मध्ये प्रथम क्रमांक आला आहे. संपूर्ण दोडामार्ग शहरातून बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शाखेचे नुकतेच नियुक्त झालेले शाखा व्यवस्थापक शरद पेडामकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. बँक ऑफ इंडियाची कसई – दोडामार्ग शहरामध्ये फार पूर्वीपासूनची शाखा आहे. या शाखेची दोडामार्ग शहरासोबत संपूर्ण तालुक्यातील गावागावांची एक वेगळी नाळ जोडलेली आहे. सेवानिवृत्त नागरिकांसोबत विविध अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी , महिला बचत गट, विविध सांस्कृतिक व क्रीडा मंडळ यांची सुद्धा या शाखेचे ऋणानुबंध अगदी कित्येक वर्षांपासून आहेत. या शाखेचे असलेले व्यवहार तसेच वाढलेली उलाढाल लक्षात घेता बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी झोन मधून या शाखेची प्रथम क्रमांक करता निवड झाली आहे. हे यश मिळविण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व कसोट्या शाखेने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शाखा व्यपस्थापक शरद पेडामकर व बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा झोनल शाखेचे अधिकारी ऋषिकेश गावडे, राजाराम परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शाखेत झाला उत्साही जल्लोष
दरम्यान शाखेच्या या प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दलच्या यशा निमित्त शाखेत नुकताच एक छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक राजेश प्रसादी, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाठ आदी उपस्थित होते. शाखेतील कर्मचारी शुभम दीपक गावडे यांचा देखील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून बँक व शाखेच्या वतीने छोटासा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक ग्राहक देखील उपस्थित होते.