बांगलादेशातील युनूस सरकार अडचणीत
संपावर गेले रेल्वेकर्मचारी : ढाका शहरात विद्यार्थ्यांकडून निदर्शने
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात अनेक महिन्यांपासून हिंसा जारी असून आता रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोहम्मद युनूस सरकारसाठी समस्या उभी केली आहे. बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त वेतनाची मागणी करत राष्ट्रव्यापी संप पुकारला आहे. यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली असून लाखो लोक प्रभावित झाले आहेत. तर दुसरीकडे ढाका येथील अनेक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीसाठी निदर्शने सुरू केली आहेत.
बांगलादेश रेल्वे रनिंग स्टाफ आणि वर्कर्स असोसिएशन पेन्शन आणि ग्रॅच्युइटी बेनिफिटशी निगडित समस्यांमुळे संप करत आहेत. रेल्वे कर्मचारी ओव्हरटाइम सॅलरी आणि पेन्शन लाभावरून दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादामुळे संपावर गेले आहेत.
संपामुळे सुमारे 400 रेल्वेगाड्यांचे संचालन प्रभावित झाले असून यामुळे 100 हून अधिक आंतर-शहरीय सेवा आणि बांगलादेश रेल्वेकडून संचालित मालगाड्या धावू शकलेल्या नाहीत. बांगलादेशात रेल्वेद्वारे प्रतिदिन लाखो लोक प्रवास करत असतात.
संपाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण मार्गांवर धावणाऱ्या बसेसमधून रेल्वे तिकीट आरक्षित केलेल्या लोकांना प्रवास करण्याची अनुमती बांगलादेशच्या रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेश रेल्वे मंत्रालय अत्यंत प्रामाणिक असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आम्ही अर्थ मंत्रालयासोबत नियमित संपर्कात आहोत असे सरकारकडून सांगण्यात आले.