चिकन नेकनजीक बांगलादेशचा धोकादायक प्लॅन
भारतीय क्षेत्रानजीक चीन धावपट्टी तयार करणार
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या लालमोनिरहाट जिल्ह्यात चीन धावपट्टी तयार करत आहे. तर या धावपट्टीकरता पाकिस्तानी कंपनी सहकार्य करणार आहे. यासंबंधीची माहिती समोर आल्यावर भारत सरकार अलर्ट झाले असून तेथील घडामोडींवर पूर्ण नजर ठेवली जात आहे. बांगलादेशचा लालमोनिरहाट जिल्हा भारताच्या चिकन नेक संबोधिल्या जाणाऱ्या भागाशी जोडलेला आहे तसेच हा भाग रणनीतिक स्वरुपात अत्यंत संवेदनशील आहे. लालमोनिरहाट जिल्हा पश्चिम बंगालच्या कूचबिहार आणि जलपाईगुडीला लागून आहे. पश्चिम बंगालचे हे दोन्ही जिल्हे ईशान्य भारताच्या राज्यांना उर्वरित देशाशी जोडतात. अशा स्थितीत या क्षेत्रनजीक चीनला धावपट्टी निर्माण करण्याची अनुमती देत बांगलादेशने भारताची चिंता वाढविली आहे. या भागापासून चिकन नेक नजीकच असून भारताच्या संपर्कव्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंतच्या चिंतेत यामुळे वाढ झाली आहे.
बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी अलिकडेच चीनचा दौरा केला होता. याच दौऱ्यात चिनी धावपट्टी निर्माण करण्यावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. परंतु या प्रकल्पावरुन दोन्ही देशांच्या चर्चेच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये कुठलाही उल्लेख नाही. चीन आणि पाकिस्तान या देशांची चिकन नेकवर दीर्घकाळापासून वक्रदृष्टी राहिली आहे. या भागात लोकसंख्येचे संतुलन देखील मागील काही दशकांमध्ये बिघडले असून हा भाग भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सातत्याने संवेदनशील ठरला आहे.
चिकन नेकचा भाग एकीकडे ईशान्येतील राज्यांना उर्वरित देशांशी जोडतो, तर दुसरीकडे हा भाग नेपाळ, बांगलादेश, भूतान या देशांच्या सीमेला लागून आहे. चिकन नेकच्या सुरक्षेकरता भारतीय सैन्याने मोठी तयारी केली आहे, परंतु आता बांगलादेशात चीनकडून धावपट्टी निर्माण केली जाणार असल्याने चिंता वाढली आहे. याचा भारताच्या सुरक्षेवर थेट प्रभाव पडणार आहे. तर दुसरीकडे मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्यानंतर पाकिस्तानचे विदेशमंत्री इशाक डार हे 24 एप्रिल रोजी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यापूर्वी 17 एप्रिलपासून पाकिस्तानचे विदेश सचिव बांगलादेशच्या दौऱ्यावर असणार आहेत. 2012 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा एखादा मंत्री बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.