बांगलादेशची दुसऱ्या डावात घसरगुंडी
चेस, वॉरिकेन, जोसेफ यांची प्रभावी गोलंदाजी
वृत्तसंस्था, मीरपूर
विंडीजचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील येथे सुरु झालेल्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशने विंडीजवर 106 धावांची आघाडी मिळवली असली तरी त्यांची दुसऱ्या डावात घसरगुंडी झाली आहे. बांगलादेशने दुसऱ्या डावात 6 बाद 79 धावा जमविल्या आहेत. शुक्रवारी खेळाचा तिसरा दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात 12 गडी बाद झाले.
या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 272 धावांवर आटोपला. बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या शदमान इस्लामने शानदार शतक (105) झळकविले. विंडीजच्या वॉरिकेनने 53 धावांत 5 तर शमार जोसेफ आणि बिशप यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर विंडीजने 4 बाद 134 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित 6 गडी 111 धावांत तंबूत परतले. विंडीजचा पहिला डाव 82.5 षटकात 245 धावांत समाप्त झाला. बांगलादेशने पहिल्या डावात 27 धावांची आघाडी मिळवली. विंडीजच्या पहिल्या डावात तेजनरेन चंद्रपॉलने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 56, कॅम्पबेलने 2 षटकार आणि 6 चौकारांसह 54, ग्रिव्ह्जने 2 चौकारांसह 46 तसेच कर्णधार चेसने 5 चौकारांसह नाबाद 43 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे नईम हसनने 33 धावा 4 तर तैजूल इस्लाम आणि मेहदी हसन मिराझ यांनी प्रत्येकी 2 तसेच हसन मेहमूद आणि एस. इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारावेळी विंडीजने 6 बाद 213 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांचे शेवटचे 4 गडी 32 धावांची भर घालत तंबूत परतले.
27 धावांची आघाडी घेतलेल्या बांगलादेश संघाचा दुसरा डाव मात्र कोलमडला. विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकले नाहीत. चहापानापर्यंतच्या सत्रात बांगलादेशने 13 षटकात 4 बाद 34 धावांपर्यंत मजल मारली होती. खेळाच्या शेवटच्या सत्रात बांगलादेशने आणखी 2 गडी गमविले. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकर थांबविण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात शदमान इस्लामने 2 चौकारांसह 13, कर्णधार शांतोने 1 चौकारासह 10 धावा केल्या. रिदॉय आणि तानझिद हसनला खाते उघडता आले नाही. लिटन दास केवळ 4 धावांवर तर मेहदी हसन मिराझ 9 धावांवर बाद झाले. जाकेर अली 1 चौकारासह 18 धावांवर तर नईम हसन 2 चौकारांसह 18 धावांवर खेळत आहे. विंडीजतर्फे चेसने 25 धावांत 3, वॉरिकेनने 19 धावांत 2 तर शमार जोसेफने 1 गडी बाद केला. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून शनिवारी चौथ्या दिवशी या सामन्याचा निकाल अपेक्षित आहे.
संक्षिप्त धावफलक - बांगलादेश प. डाव सर्वबाद 272, विंडीज प. डाव 82.5 षटकात सर्वबाद 245 (कॅम्प्बेल 54, चंद्रपॉल 56, ग्रिव्ह्ज 46, चेस 43, नईम हसन 4-33, मेहदी हसन मिराझ व तैजुल इस्लाम प्रत्येकी 2 बळी, हसन मेहमूद व एस. इस्लाम प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश दु. डाव 29 षटकात 6 बाद 79 (जाकर अली खेळत आहे 18, नईम हसन खेळत आहे 18, शदमान इस्लाम 13, शांतो 10, चेस 3-25, वॉरिकेन 2-19, शमार जोसेफ 1-17).