बांगलादेशी सैनिकांचा आसाम सीमेवर हस्तक्षेप
भारतीय हद्दीतील मंदिराचे बांधकाम रोखले : तीन दिवसांपासून तणाव
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशच्या सीमेवर आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून तणाव आहे. 5 डिसेंबर रोजी बांगलादेशी सैनिक नदी ओलांडून आसाममध्ये दाखल झाले होते. येथे नदीकाठच्या जंगल रस्त्यावर, स्थानिक लोक मां मनसादेवीच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार असताना कामगारांना धमकावून ‘बीजीबी’ने काम बंद पाडले. बांगलादेशी सैनिकांच्या घुसखोरीची माहिती बीएसएफला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर मंदिर नो मॅन लँडपासून दूर असल्याचे बीजीबीच्या जवानांना स्पष्टपणे समजावून सांगितले. तरीही त्यांनी या समजुतीकडे दुर्लक्ष करत हस्तक्षेप सुरूच ठेवला आहे.
बांगलादेशचे सीमा संरक्षक सैनिक (बीबीजी) कुशियारा नदीच्या या बाजूला म्हणजेच भारतीय सीमेवर बांधण्यात येत असलेल्या मंदिरावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, भारतीय बीएसएफ जवानही त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. प्रकरण आसामच्या श्रीभूमी भागात कुशियारा नदी ही दोन्ही देशांमधील सीमारेषा असून नदीच्या दोन्ही बाजूंना 150 मीटर अंतर आहे. क्षेत्र नो मॅन्स लँड आहे. येथे जाण्यापूर्वी किंवा कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. आसाममधील श्रीभूमी जिह्याची 94 किमी सीमा बांगलादेशला लागून आहे. यापैकी 43 किमी क्षेत्र नदीकाठचे आहे. तर आंतरराष्ट्रीय सीमेच्या 4 किमी परिसरात कुंपण घालण्यात आलेले नाही.