For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशी खासदाराची कोलकात्यात हत्या

06:27 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशी खासदाराची कोलकात्यात हत्या
Advertisement

मृतदेह सापडला : 9 दिवसांपासून होते बेपत्ता, तिघांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये उपचारासाठी आलेले बांगलादेशी खासदार अन्वाऊल अझीम यांचा मृतदेह कोलकाता येथे सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मृत खासदार गेल्या 9 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी (22 मे) कोलकाता येथील न्यूटाऊन येथे त्यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासाअंती त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

बांगलादेशचे खासदार अन्वाऊल अझीम हे 12 मे रोजी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये उपचारासाठी आले होते. ते बारानगर येथे मित्राच्या घरी राहत होते. 13 मे रोजी डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नाही. 14 मे रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच बांगलादेश दुतावासालाही याबाबत माहिती देण्यात आली होती.

खासदार बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला. तपासादरम्यान त्यांचे शेवटचे ठिकाण बिहारमधील मुझफ्फरपूर येथे आढळून आले. कोलकाता येथून पोलिसांचे एक पथक बिहारला पाठविण्यात आले. परंतु आता अन्वाऊल अझीम यांचा मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर 9 दिवसांनी कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये सापडला आहे. त्यांचा खून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन बांगलादेशींना अटक

याचदरम्यान, बुधवारी बांगलादेशचे गृहमंत्री असदुजमान खान यांनी अझीम यांची हत्या झाल्याचे जाहीर केले. त्यांचे मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. त्यांनी कट रचून खासदाराची हत्या केल्याचे समजते. बांगलादेश पोलिसांनी 56 वषीय खासदाराच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या हत्येमागील कारणे लवकरच उघड करणार असल्याचे असदुजमान यांनी सांगितले. भारतीय पोलीसही याप्रकरणी माहिती गोळा करत आहेत.

अन्वाऊल अझीम हे बांगलादेशच्या झेनैदह-4 लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांच्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे पश्चिम बंगालपासून बांगलादेशपर्यंत घबराट पसरली. बांगलादेशी खासदार ज्याठिकाणी जाणे अपेक्षित होते त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. ते ज्या वाहनात चढले होते त्यांचे ठिकाण न्यू टाऊन परिसरात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. यानंतर पोलिसांनी बराकपूर आणि आसपासच्या परिसरात त्यांचा शोध सुरू केला, मात्र ते कुठेही सापडले नाहीत. 12 मे रोजी अन्वाऊल अझीम हे आपला मित्र गोपाल विश्वास यांच्या घरी पोहोचले होते. 12 मेच्या रात्री ते तेथेच थांबले 13 मे रोजी उपचारासाठी निघून गेल्यानंतर ते बेपत्ता झाले होते.

भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

कोलकाता येथे आल्यानंतर बरानगरमध्ये राहणाऱ्या आपल्या जुन्या मित्राचे घर सोडल्यानंतर अन्वाऊल अझीम यांनी न्यू टाऊनमधील एका निवासस्थानात फ्लॅट भाड्याने घेतला होता. काही लोकांसह तेथे ते वास्तव्यास होते. न्यू टाऊन पोलीस ठाण्याचे पोलीस आणि विधाननगर आयुक्तालयाचा गुप्तचर विभाग या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

Advertisement
Tags :

.