बांगलादेशचा आयर्लंडवर विजय
वृत्तसंस्था / सिलेत
शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सलामीचा फलंदाज मेहमुदुल हसन जॉय आणि कर्णधार नजमुल हुसेन शांतो यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान बांगलादेशने आयर्लंडचा एक डाव आणि 47 धावांनी दणदणीत पराभव केला. आता उभय संघातील दुसरी कसोटी ढाका येथे येत्या बुधवारपासून खेळविली जाईल.
या पहिल्या कसोटीत बांगलादेशने आपला पहिला डाव 8 बाद 587 धावांवर घोषित केला. मेहमुदुल हसन जॉयने 171 तर शांतोने 100 धावा झळकविल्या. तत्पूर्वी आयर्लंडचा पहिला डाव 286 धावांत आटोपला होता. बांगलादेशला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी आयर्लंडला दुसऱ्या डावात 301 धावा जमविणे जरुरीचे होते. पण शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच त्यांचा दुसरा डाव 254 धावांत आटोपला. आयर्लंडच्या दुसऱ्या डावात पॉल स्टर्लिंग आणि कार्मिचेल यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकविताना 96 धावांची भागिदारी केली. स्टर्लिंगने 60 तर कार्मिचेलने 59 धावा जमविल्या. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने 50 धावांत 3 गडी बाद केले. हसन मुरादने 47 धावांत 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक: आयर्लंड प. डाव 286, बांगलादेश प. डाव 8 बाद 587, डाव घोषित, आयर्लंड दु. डाव 254 (स्टर्लिंग 60, कार्मिचेल 59, मेहदी हसन मिराज 3-50, हसन मुराद 2-47).