बांगलादेश काळोखात बुडणार
युनूस सरकारचा खजिना रिकामी : कर्ज फेडण्यासाठी नाही पैसे
वृत्तसंस्था/ ढाका
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. स्थिती अत्यंत बिघडल्याने बांगलादेशकडे आता वीज खरेदी आणि थकबाकी भरण्यासाठी देखील पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. अशास्थितीत आगामी काळात बांगलादेशला तीव्र वीजसंकटला सामोरे जावे लागू शकते. यामुळे पूर्वीच संकटात असलेल्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला आणखी झटका बसू शकतो.
बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डावर विविध स्वतंत्र वीज उत्पादक (आयपीपी) आणि पेट्रोबांगलाची वीज अन् गॅस खरेदीसाठी 43,473 कोटी टका इतकी थकबाकी आहे. या रकमेतून भारतीय अदानी समुहाला 10,309 कोटी टका मिळणार आहेत. तर स्थानिक आयपीपीचे सुमारे 16 हजार कोटी टका देणे बाकी आहे. पेरा आणि रामपाल समवेत संयुक्त औद्योगिक वीज प्रकल्पांना 10 हजार कोटी टका द्यावे लागणार आहेत. तर पेट्रोबांगलाला 7,164 कोटी टका द्यावे लागतील.
सातत्याने वाढतेय वीजेची मागणी
बांगलादेशात मागील उन्हाळ्यात वीजेची कमाल मागणी 17,200 मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. परंतु सरकार सरासरी केवळ 15,500 मेगॉवटपर्यंत पुरवठा करू शकले होते, यामुळे 2000-2200 मेगावॅटचा तुटवडा भासला होता. मागणीत अनुमानित 6 टक्क्यांच्या वार्षिक वृद्धीसोबत बांगलादेश स्वतंत्र वीज उत्पादक संघाने मार्च ते सप्टेंबर या कालावधीत वीजेची मागणी वाढून 18,232 मेगावॅट होणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे बीपीडीबीने आगामी काळासाठी अधिकृत मागणी-पुरवठा पूर्वानुमान जारी केलेला नाही.
ब्लॅकआउटची चिन्हे
युनूस सरकारने थकबाकी न भरल्यास देशाला वीज उत्पादनात 3500-4000 मेगावॅटच्या तुटवड्याला सामोरे जावे लागू शकते. जोपर्यंत आयपीपीला थकबाकीच्या 16 हजार कोटी टकामधील काही हिस्सा देण्यात येत नाही तोवर वीज उत्पादनासाठी आवश्यक इंधन आयात करण्यासाठी ऋण पत्र सादर करणे अशक्य ठरेल असे बांगलादेश स्वतंत्र वीज उत्पादक संघाचे अध्यक्ष डेव्हिड हसनत यांनी म्हटले आहे.
कोळशाचा वापर वाढविणार
स्वतंत्र वीज उत्पादकांना (आयपीपी) द्यावी लागणार रक्कम तुलनेत कमी आहे, कारण सरकारने अलिकडेच बाँड जारी करणे आणि अन्य मार्गांनी खासगी वीज उत्पादकांना 8 हजार कोटी टका इतकी रक्कम दिली आहे. सरकार आगामी काळात कोळसा आधारित वीज प्रकल्पांमधून पूर्ण क्षमतेने उत्पादनाला प्राथमिकता देत आहे, कारण आयात गॅस, फर्नेस ऑइल किंवा डिझेलचा वापर करण्याच्या तुलनेत कोळशाद्वारे वीजनिर्मितीचा खर्च कमी असल्याचा दावा बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याने केला. बीपीडीबीच्या आकडेवारीनुसार फर्नेस ऑइल आधारित वीज प्रकल्पांची क्षमता 6,442 मेगावॅट इतकी असून याचा प्रति युनिट उत्पादन खर्च 16.40 टका आहे. याच्या उलट कोळसा आधारित वीज उत्पादनाचा खर्च जवळपास 18 टका प्रति युनिट आहे. 5,108 मेगावॅट क्षमता असलेल्या वीज प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर आमचा भर आहे. यानंतर पेट्रोबांग्लाकडून पुरवठा करण्यात आलेल्या गॅसचा वापर करत स्थानिक वायू आधारित प्रकल्पांमध्ये केला जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.