‘तीस्ता’साठी चीनकडून अर्थसहाय्य घेणार बांगलादेश
पंतप्रधान तारिक रहमान जाणार चीन दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान लवकरच स्वत:च्या पहिल्या विदेश दौऱ्याच्या अंतर्गत चीनला जाऊ शकतात. तारिक रहमान यांना शपथग्रहणानंतर भारत तसेच भूतानसारख्या शेजारी देशांकडूनही आमंत्रण मिळाले होते, परंतु बांगलादेशचे पंतप्रधान चीनला स्वत:ची प्राथमिकता ठरवत आहेत. बांगलादेश तीस्ता नदीवरील प्रकल्पासाठी आग्रही असून याकरता चीनकडून अर्थसहाय्य मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. अशास्थितीत रहमान यांच्या दौऱ्याचा मुख्य अजेंडा देखील हाच असणार आहे.
बांगलादेशने चालू महिन्यातच तीस्ता नदी योजनेसाठी चीनकडून अधिकृत स्वरुपात मदत मागितली होती. याचबरोबर अनेक वर्षांपासून प्रलंबित तीस्ता करारावरून आता भारताची प्रतीक्षा करणार नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच बांगलादेशने जाहीर केले होते. तीस्ता प्रकल्पासाठी बांगलादेश चीनची निवड करणार असल्याचे विदेशमंत्री खलीलुर रहमान यांनी म्हटले होते.
निधी देण्याची चीनची तयारी
तीस्ता नदी प्रकल्पासाठी चीनकडून अब्जावधी डॉलर्सचा निधी मिळविणे हा रहमान यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान रहमान लवकरच चीनचा दौरा करतील आणि चीनची ‘एक्सिम बँक’ तीस्ता नदी व्यवस्थापन आणि बहाली प्रकल्पाला निधी देण्यास तयार असल्याचे बांगलादेशचे विदेश विषयक सल्लागार हुमायूं कबीर यांनी सांगितले आहे.
तीस्ता नदीवरून वाद
मागील 15 वर्षांपासून भारत आणि बांगलादेश दरम्यान तीस्ता नदीच्या जलवाटपाचा करार रखडला आहे. दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळापासून चर्चा होत असली तरीही अद्याप करार होऊ शकलेला नाही. नदीत समान हिस्सा मिळाला अशी बांगलादेशची इच्छा आहे, परंतु पश्चिम बंगालमधील यापूर्वीचे ममता सरकार याला विरोध करत राहिले होते. यापूर्वी 1983 मध्ये दोन्ही देशांदरम्यान एक अस्थायी करार झाला होता, ज्यात बांगलादेशला 36 टक्के आणि भारताला 39 टक्के पाणी देण्याची तरतूद होती. तर उर्वरित 25 टक्के पाण्याबद्दल निर्णय नंतर घेतला जाणार होता. परंतु हा करार पूर्णपणे लागू होऊ शकलेला नाही. भारत आणि बांगलादेश दरम्यान 54 नद्या वाहतात, परंतु आतापयर्तं केवळ गंगा आणि कुशियारा नदीसंबंधीच करार होऊ शकला आहे.
भारतासाठी धोक्याची घंटा
तीस्ता नदी सिक्कीम राज्यात उगम पावते आणि पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात शिरते. यानंतर ती ब्रह्मपुत्रा नदीत सामावेत, बांगलादेश या नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारणासाठी एक महाप्रकल्प निर्माण करू इच्छितो, ज्यात गुंतवणुकीसाठी चीन आतूर आहे. या प्रकल्पात चीनच्या प्रवेशामुळे भारताला धोका निर्माण होऊ शकतो. बांगलादेशचा तीस्ता प्रकल्प पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथील ‘चिकन नेक’ कॉरिडॉरच्या अत्यंत नजीक आहे. अशास्थितीत युद्ध किंवा तणावाच्या स्थितीत चीन या कॉरिडॉरच्या मदतीने भारताला नुकसान पोहोचवू शकतो.