बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या शनिवारी पावसाने बाधा आणलेल्या पहिल्या दिवशी बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकून आपला मोहीम सुरू केली, बांगलादेशने कमी धावसंख्येच्या सामन्यात नेपाळला पाच गडी राखून हरवले, तर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर मात केली. मलेशियामधील खराब हवामानामुळे तीन सामने रद्द करण्यात आले, इंग्लंड आणि आयर्लंडचा सामनाही अर्धवट सोडून द्यावा लागला, तर नवोदित नायजेरिया, सामोआ, अमेरिका आणि पाकिस्तान मैदानात उतरू शकले नाहीत.
बांगलादेशविरुद्ध नवोदित नेपाळ 18.2 षटकांत 52 धावांतच गारद झाला. प्रथम फलंदाजीसाठी उतरल्यानंतर नेपाळची सलामीवीर सना प्रवीणला (32 चेंडूंत 19 धावा) कोणीही साथ देऊ शकले नाही. प्रत्युत्तर देताना बांगलादेशचीही तिसऱ्या षटकात तीन बाद 11 अशी स्थिती झाली होती. पण सादिया इस्लाम व सुमैया अख्तर यांनी प्रत्येकी दुहेरी आकडी धावसंख्या नोंदवून बांगलादेशला लक्ष्याच्या जवळ नेले.
बोमियोमध्ये न्यूझीलंडवर दक्षिण आफ्रिकेने 22 धावांनी विजय मिळविला. सामना 11 षटकांपर्यंत कमी करण्यात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सिमोन लॉरेन्स आणि जेम्मा बोथा यांच्या विश्वचषकातील पहिल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर 7 बाद 91 धावा केल्या. न्यूझीलंडने एम्मा मॅकलिओडच्या (34 धावा) जोरावर जोरदार झुंज दिली होती. पण ती बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचे आव्हान संपले. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने तीन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या विजयात 15 वर्षीय ब्रेने ठसा उमटविताना फक्त एका धावेच्या मोबदल्यात तीन बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या नऊ गडी राखून मिळविलेल्या विजयात एक जबरदस्त सूर मारून झेलही घेतला. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एलेनोर लारोसाने तिच्या पहिल्याच षटकात तीन फलंदाज बाद केले. स्कॉटलंडच्या संघाचे आव्हान 48 धावांवर आटोपले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या केट पेलेने पहिल्याच षटकात मोली पार्करला तीन षटकार खेचले. तेथून ऑस्ट्रेलियाचा संघ थांबण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले. पावसामुळे खंड पडला असला, तरी अवघ्या 6.4 षटकांत ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय पूर्ण केला.
इंग्लंड आणि आयर्लंडने यांच्यातील सामन्यात इंग्लंडने 144 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. आयर्लंडचा पाठलागही संतुलित राहिला होता. पण आयर्लंडचा डाव सुरू होऊन केवळ 23 चेंडू टाकले गेल्यानंतर पावसामुळे सामना सोडून द्यावा लागला.