भारतीयांच्या व्हिसा सेवांवर बांगलादेशकडून निर्बंध
तूर्तास व्यवसाय-रोजगार व्हिसा सुरू राहणार : द्विपक्षीय तणावादरम्यान भारतीयांना धक्का देण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ढाका, नवी दिल्ली
आयपीएलमधून एका खेळाडूला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाच्या निषेधार्थ बांगलादेशने भारताला मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. सध्या विद्यार्थी आणि व्यवसाय व्हिसा सेवा सुरूच राहतील. बांगलादेश सरकारने दिल्ली, आगरतळा, मुंबई, गुवाहाटी आणि चेन्नई येथील त्यांच्या दूतावासांना आणि वाणिज्य दूतावासांना सामान्य व्हिसा सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाकडे दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या तणावाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जात आहे.
भारतासोबतच्या संबंधांमध्ये वाढत्या तणावादरम्यान बांगलादेशने व्हिसा सेवेवर निर्बंध लादण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बांगलादेशने भारतीय नागरिकांना व्हिसा देण्यावर आणखी निर्बंध लादले आहेत. शिवाय, बांगलादेशने नवी दिल्ली व्यतिरिक्त कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथील त्यांच्या मिशनवरही हे निर्बंध वाढवले आहेत. यापूर्वी, गेल्या महिन्यात मिशनजवळ झालेल्या निदर्शनांनंतर नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी निलंबित केल्या होत्या.
भारतीयांच्या व्हिसासंबंधीचे निर्बंध गुरुवारपासून लागू झाले. बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री व्हिसावरील निर्बंधांसंबंधीच्या निर्णयाची पुष्टी केली. व्यवसाय आणि रोजगार व्हिसा वगळता सर्व व्हिसांना स्थगिती देण्यात आली आहे. कोलकाता येथील बांगलादेश उपायुक्तालयातील कॉन्सुलर आणि व्हिसा सेवा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त मुंबई आणि चेन्नई येथील त्यांच्या मिशनवर भारतीयांसाठी पर्यटक आणि इतर व्हिसा सेवा निलंबित करण्यात आल्याचे बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने अहवालात म्हटले आहे.
शेजारी देशांमधील सुरू असलेल्या तणावाबाबत सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्यून’ने राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 22 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने मिशनजवळील निदर्शनांनंतर व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्रिपुरातील सहाय्यक उच्चायोगानेही मिशनबाहेर झालेल्या निदर्शनांनंतर व्हिसा सेवा निलंबित करण्याची घोषणा केली.
भारताकडून आधीच सेवा बंद
बांगलादेशपूर्वी भारताने व्हिसा सेवा यापूर्वीच स्थगित करताना पुढील सूचना येईपर्यंत निलंबित राहण्याची घोषणा केलेली आहे. शेख हसीना यांचे विरोधक उस्मान हादी यांच्या हत्येनंतर, बांगलादेशात हिंसाचार आणि तणाव निर्माण झाला. निदर्शक भारतविरोधी घोषणा देत असून हिंदूंविरोधी हिंसाचार माजवला जात आहे. तसेच निदर्शकांनी भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयावरही हल्ला केल्यामुळे भारताने चितगावमधील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र बंद करत व्हिसा सेवा बंद केल्या आहेत.
बांगलादेशच्या निर्णयामागील कारण
बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले सुरूच आहेत. गेल्या 18 दिवसांत सहा हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मधून बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळले. त्यामुळेच बांगलादेशने भारतात व्हिसा सेवा निलंबित करत टी-20 विश्वचषकावेळी भारतात खेळण्यासाठी येण्यास नकार दिला. बीसीसीआयने बांगलादेशचा प्रस्ताव अमान्य केला असला तरी, बांगलादेश अजूनही खेळण्यास तयार नसलेला दिसतो.
भारत-बांगलादेश संबंध तणावपूर्ण
शेख हसीनांचे सरकार पडल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातून पळून गेलेल्या शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे. बांगलादेशने याचा निषेध करत तिला परत पाठवण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, उस्मान हादीच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे निदर्शकांच्या भारतविरोधी कारवायांमुळे संबंध आणखी बिघडले आहेत.