भारतातील टी-20 विश्वचषक सामने खेळण्यास बांगलादेशचा नकार
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर निर्णय, सामने श्रीलंकेत हलविण्याची
वृत्तसंस्था/ ढाका
आयपीएल संघ केकेआरने बीसीसीआयच्या सूचनेनुसार वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला संघातून वगळल्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) सुरक्षाविषयक चिंता आणि सरकारच्या सल्ल्याचा हवाला देत पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आपला राष्ट्रीय संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय रविवारी घेतला.
शनिवारी रहमानला संघातून वगळण्याच्या निर्णयामागे बीसीसीआयने दोन्ही देशांमधील सध्याच्या संबंधांचा स्पष्टपणे उल्लेख केला नसला, तरी हा निर्णय सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. रहमानला आयपीएलमधून नाट्यामयरीत्या वगळल्यामुळे बीसीबीने शनिवारी रात्री तातडीची बैठक बोलावली आणि एका दिवसानंतर संचालक मंडळाची पुन्हा बैठक झाली. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघ भारतात जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
परिस्थितीवर सखोल विचार केल्यानंतर आणि भारतातील बांगलादेश संघाच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या चिंता लक्षात घेऊन तसेच बांगलादेश सरकारचा सल्ला विचारात घेऊन संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे की, सध्याच्या परिस्थितीत बांगलादेश राष्ट्रीय संघ या स्पर्धेसाठी भारतात प्रवास करणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) या प्रकरणावर तोडगा काढावा लागेल, कारण बांगलादेशचे सर्व चार लीग सामने भारतात होणार आहेत. पाकिस्तानसोबतच्या व्यवस्थेप्रमाणेच बांगलादेशलाही आपले सर्व सामने स्पर्धेचा सहयजमान असलेल्या श्रीलंकेत हलवायचे आहेत. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बीसीबीने स्पर्धेची नियामक संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेरील ठिकाणी (श्रीलंकेत) हलवण्याचा विचार करण्याची औपचारिक विनंती केली आहे, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.
बीसीबीने निवेदन जारी करण्यापूर्वीच सरकारी सल्लागार आसिफ नझऊल यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले होते की, मंडळाने आपला संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीबीच्या तातडीच्या बैठकीनंतर नझऊल यांनी मंडळाला जय शाह यांच्या नेतृत्वाखालील आयसीसीला बांगलादेशचे चार लीग सामने (तीन कोलकात्यात आणि एक मुंबईत) श्रीलंकेत हलवण्यास सांगण्याचे निर्देश दिले. करारबद्ध असूनही बांगलादेशी क्रिकेटपटू भारतात खेळू शकत नसेल, तर बांगलादेशचा राष्ट्रीय संघ विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात प्रवास करताना सुरक्षितता अनुभवू शकत नाही हे मंडळाने स्पष्ट केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
शाहरूख खानच्या सहमालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) बांगलादेशच्या सदर डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला बीसीसीआयच्या आदेशानंतर संघातून वगळले आहे. त्याला गेल्या महिन्यात अबुधाबी येथील लिलावात बोली युद्धानंतर 9.20 कोटी ऊपयांना करारबद्ध करण्यात आले होते.
बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण रोखणार ?
नझऊल यांनी असेही सांगितले की, त्यांनी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागाराला बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण निलंबित केले जाईल याची खात्री करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बांगलादेशी क्रिकेट, क्रिकेटपटू किंवा बांगलादेशचा कोणताही अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस संपले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.