For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष राजीनाम्याच्या पवित्र्यात

07:00 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष राजीनाम्याच्या पवित्र्यात
Advertisement

वृत्तसंस्था/ढाका

Advertisement

बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी जवळपास दोन वर्षे आधी राजीनामा देऊ शकतात, असा दावा बांगलादेशी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच पुन्हा शेख हसीना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याने सरकार त्यांच्यावर नाराज आहे. शहाबुद्दीन यांनी एप्रिल 2023 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर आवामी लीग सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जाण्यास भाग पडले. तेव्हापासून, शहाबुद्दीन हे आवामी लीगच्या काळातील पदावर कायम असलेले एकमेव घटनात्मक अधिकारी आहेत.

शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची घोषणा केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले आहे. याचदरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याबद्दलची चर्चा तीव्र झाली आहे. शहाबुद्दीन यांचा अध्यक्षपदावरील कार्यकाळ पुढे चालू राहणे सध्याच्या सरकारला आता सोयीचे वाटत नाही, असे वृत्त अनेक बांगलादेशी माध्यमांनी दिले आहे. राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच शेख हसीना यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा आहे. दरम्यान, ‘द डेली स्टार’ने एका वरिष्ठ बीएनपी नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, शहाबुद्दीन आणि शेख हसीना यांच्यातील कथित फोन संभाषण हे राजीनाम्याचे एकमेव कारण नाही. त्यांच्या नाराजीबाबत आणखी अनेक कारणे असली तरी त्याबाबत सध्या वरिष्ठ पातळीवरून कोणतेही भाष्य होताना दिसत नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.