For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश राष्ट्रपतींकडून मोहम्मद युनूसांवर आरोप

06:22 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश राष्ट्रपतींकडून मोहम्मद युनूसांवर आरोप
Advertisement

युनूसांनी विरोधात रचले होते अनेक कट : पदाचा राखला नाही सन्मान

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशातील अंतरिम सरकारचा कार्यकाळ संपताच आणि सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाल्यावर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी स्वत:चे मन मोकळे केले आहे. यापूर्वी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर त्यांनी एकही प्रश्न उपस्थित केला नव्हता. अल्पसंख्याकांवर अत्याचार होत राहिले आणि भारतासोबतचे संबंध अंतरिम सरकारने बिघडविले होते. आता याप्रकरणी मोहम्मद युनूस यांनी आपल्याला याप्रकरणी अंधारात ठेवले होते असा दावा शहाबुद्दीन करत आहेत.

Advertisement

मोहम्मद युनूस यांनी संस्थांदरम्यान समन्वयावर लक्ष दिले नाही तसेच कुठल्याही निर्णयाची माहिती ते मला देत नव्हते. युनूस यांच्या विदेश दौऱ्याची माहितीही मला मिळत नव्हती. विदेश धोरणाशी संबंधित कुठलीही माहिती माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती. मला एकाकी पाडण्यासाठी सर्व राजकीय मार्ग अवलंबिले जात होते असा आरोप राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी केला आहे.

विदेश दौऱ्याबद्दल घेतला जात नव्हता सल्ला

महत्त्वाच्या निर्णयावर राष्ट्रपतींकडून सल्लामसलत करणे सरकारची जबाबदारी होती. परंतु मोहम्मद युनूस हे सर्व निर्णय स्वत:च घेत होते. विदेश दौऱ्यावर जाताना राष्ट्रपतींना माहिती देण्याची आणि परतल्यावर त्याच्या परिणामांबद्दल चर्चा करण्याची तरतूद राज्यघटनेत आहे. परंतु युनूस हे स्वत:च्या कार्यकाळात 14-15 वेळा विदेश दौऱ्यावर गेले, पण एकदाही त्यांनी माझी सहमती घेतली नसल्याचा दावा शहाबुद्दीन यांनी केला आहे.

जर कुठल्याही देशासोबत करार झाल्यास याची माहिती राष्ट्रपतींना देणे अपेक्षित होते, परंतु मला काहीच कळविले जात नव्हते. तोंडी तसेच लेखी स्वरुपातही माहिती देण्यात आली नाही. मोहम्मद युनूस यांना मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात माझी मोठी भूमिका होती. तरीही ते मला दुर्लक्षित करत होते. ते कधीच मला भेटण्यासाठी आले नव्हते असे राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे.

विद्यापीठ दीक्षांत सोहळ्यापासून रोखले

कतार आणि कोसोवोकडून मला दौऱ्याचे आमंत्रण मिळाले होते, परंतु माझ्याच नावाने पत्र तयार करत हे दौरे रद्द करण्यात आले.  कार्यांत अत्यंत व्यग्र असल्याने दौरा करणे शक्य नसल्याचेही पत्र मोहम्मद युनूसांकडून माझ्या नावाने तयार करण्यात आले. मला राष्ट्रपती म्हणून जनतेसमोर जाण्यापासून रोखले जात होते. माझी प्रतिमा बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझे नाव कधीच समोर येऊ नये आणि कुणी मला ओळखू नये अशी मोहम्मद युनूस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यातही सामील होण्यापासून मला रोखले जात होते असा दावा शहाबुद्दीन यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.