भारताप्रमाणे आम्हालाही सूट द्या बांगलादेशची अमेरिकेला विनवणी
बांगलादेशने वाढत्या ऊर्जा संकटादरम्यान मेरिकेकडून रशियन डिझेल खरेदीसाठी अस्थायी निर्बंध सूट देण्याची मागणी केली आहे. बांगलादेशने या सूटची मागणी करताना भारताचा दाखला दिला आहे. ज्याप्रकारे भारताला सूट देण्यात आली, तशीच सूट बांगलादेशला मिळावी असे म्हटले गेले आहे.
इराण युद्धादरमयान तेल-गॅसच्या वाढत्या किमती पाहता अमेरिकेने भारताला रशियन तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची अस्थायी सूट दिली आहे. बांगलादेशने याच सूटचा दाखला देत आम्हाला दोन महिन्यांची मागणी पूर्ण करण्याइतपत डिझेल हवे आणि ते रशियाकडून खरेदी करू इच्छितो असे बांगलादेशने म्हटले आहे.
भारताला देण्यात आलेल्या सूटसारख्याच व्यवस्थेची मागणी बांगलादेशने केली आहे. तसेच कमाल 6 लाख मेट्रिक टन रशियन डिझेल आयात करू शकतो. अमेरिकेसमोर पत्र सादर करण्यात आले असून आम्ही आता त्याच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत, असे बांगलादेशच्या ऊर्जा विभागाचे संयुक्त सचिव मोनिर हुसैन चौधरी यांनी सांगितले.
ऊर्जा आवश्यकतेसाठी आयातीवर निर्भर
सुमारे 17.5 कोटी लोकसंख्या असलेला बांगलादेश स्वत:च्या जवळपास 95 टक्के ऊर्जा आवश्यकतांसाठी आयातीवर निर्भर आहे. यामुळे तेल संकट दूर करण्यासाठी बांगलादेशच्या यंत्रणा सातत्याने जागतिक बाजाराची मदत घेत आहेत. सरकारने इंधनाचे रेशनिंग लागू केले आहे. आम्ही अमेरिका, रशिया, उझ्बेकिस्तान, अंगोला आणि ऑस्ट्रेलिया समवेत शक्य त्या सर्व ठिकाणांहून इंधन खरेदीचा प्रयत्न करत आहोत असे चौधरी यांचे सांगणे आहे.
भारताकडून आयात
बांगलादेश स्वत:च्या वर्तमान भागीदारांकडूनही आयात वाढवत आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन एप्रिलमध्ये भारताच्या नुमालीगढ रिफायनरी लिमिटेडकडून 40 हजार मेट्रिक टन डिझेल आयात करणार आहे. हे प्रमाण बांगलादेशच्या मार्चच्या खरेदीच्या जवळपास दुप्पट आहे.