‘सार्क’साठी बांगलादेश-पाकिस्तान सक्रीय
भारताचा जोर ‘बिम्सटेक’वर : दक्षिण आशियात नवी समीकरणे उदयास
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार पाकिस्तानसोबत मिळून दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेला (सार्क) पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताचे लक्ष दक्षिण आशिया आणि दक्षिणपूर्व आशियाला जोडणारी संघटना बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकोनॉमिक कोऑपरेशन)वर असताना या हालचाली होत आहेत. मोहम्मद युनूस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान सार्क मुद्द्यावर चर्चा केली आहे.
मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय महफूज आलम देखील सार्कला पुनरुज्जीवित करण्यासाठी धडपड करत आहेत. आलम यांचा हिज्ब-तहरीरशी संबंध आहे. आलम यांनी अलिकडेच भारताच्या काही हिस्स्यांवर कब्जा करण्याची धमकी दिली होती. पाकिस्तान युनूस सरकारचे सदस्य आणि सेवानिवृत्त बांगलादेशी सैन्याधिकाऱ्यांच्या एका वर्गाला भारताच्या विरोधात दबाव तयार करण्याच्या रणनीतिच्या अंतर्गत सार्कला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रभावित करत असल्याचे मानले जात आहे.
सार्क सध्या निष्क्रीय संघटना
पाकिस्तानचा ढाका येथील दूतावास बांगलादेशच्या विविध संस्था, मंत्रालये आणि विद्यापीठांसोबत स्वत:चा संपर्क पुन्हा सक्रीय करत सार्कसमवेत अनेक योजनांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सार्कचे महासचिव सध्या मोहम्मद गोलम सरवर असून ते बांगलादेशचे मुत्सद्दी आहेत. भारताकडून प्रस्तावित पुढाकारांवर पाकिस्तानची नकारघंटा आणि सीमापार दहशतवादावर कारवाई करण्यास नकार दिल्याने सार्क सध्या निष्क्रीय आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये काठमांडू येथे 8 देशांच्या समुहाच्या 18 व्या शिखर परिषदेदरम्यान सार्क संघटना दोन करार क्षेत्रीय रेल्वे करार आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीसाठी मोटर वाहन कराराला अंतिम देण्याच्या समीप होती. त्या काळात पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारने सैन्याच्या दबावामुळे हे प्रस्ताव रोखले होते.
19 व्या परिषदेपासून राखले अंतर
पाकिस्तानमधून सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 व्या सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. या परिषदेचे आयोजन नवाज शरीफ सरकारकडून नोव्हेंबर 2016 मध्ये इस्लामाबादमध्ये केले जाणार होते. परंतु भारताच्या नकारामुळे ही योजना बारगळली होती. पाकिस्तान आणि बांगलादेशकडून मिळालेल्या चिथावणीमुळे नेपाळने सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कमध्ये सार्क देशांच्या विदेश मंत्र्यांची बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारत याकरता उत्सुक नव्हता. भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बिम्सटेक बैठकीत भाग घेतला होता. पाकिस्तान दहशतवादाला बळ पुरवत असल्याने सार्कमध्ये त्याच्यासोबत सहकार्य अवघड असल्याचे भारताचे मानणे आहे.
भूराजकीय समीकरणे बदलली
हा घटनाक्रम दक्षिण आशियाई क्षेत्रात भूराजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल दर्शवितो. भारत बिम्सटेकवर लक्ष केंद्रीत करत आहे. ही संघटना क्षेत्रीय सहकार्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ प्रदान करते. यात पाकिस्तान सामील नाही. यामुळे भारताला दक्षिणपूर्व आशियाई देशांसोबत स्वत:चे संबंध मजबूत करण्यास मदत मिळते. बांगलादेशातील वर्तमान राजकीय स्थिती पाकिस्तानच्या प्रभावामुळे संवेदनशील ठरली आहे. तसेच ही क्षेत्रीय स्थिरता आणि सहकार्यासाठी आव्हाने निर्माण करणारी आहे.