न्यूझीलंडला नमवून बांगलादेशची विजयी सलामी
टी-20 मालिका : क्लार्क, क्लीव्हर यांची अर्धशतके वाया, सामनावीर हृदोयचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था, चेतोग्राम
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान बांगलादेशने येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. 27 चेंडूत नाबाद 51 धावा झळकविणाऱ्या बांगलादेशच्या तौहीद हृदोयला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
न्यूझीलंडचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर असून उभय संघात यापूर्वी वनडे मालिका खेळविली गेली होती. त्यानंतर या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 18 षटकात 4 बाद 183 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला.
न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या कॅटीन क्लार्क आणि डॅनी क्लीव्हर यांनी दमदार अर्धशतके झळकविली. कर्णधार निक केलीने 39 तर क्लार्कसनने नाबाद 27 धावा जमविल्या. सलामीचा टीम रॉबिनसन खाते उघडण्यापूर्वी धावचीत झाला. त्यानंतर क्लार्क आणि क्लीव्हर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 50 चेंडूत 99 धावांची भागिदारी केली. क्लार्कने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा झळकविल्या. क्लीव्हरने 28 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा जमविल्या. कर्णधार केलीने 27 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 39 तसेच क्लार्कसनने केवळ 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 27 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत न्यूझीलंडने 61 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर न्यूझीलंडने 2 बाद 100 धावा जमविल्या होत्या. बांगलादेशतर्फे रिशाद हुसेनने 2 तर एस. इस्लाम, तन्झिम हसन साकीब आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये सैफ हसन आणि तानझिद हसन या सलामीच्या जोडीने 33 चेंडूत 41 धावांची भागिदारी केली. सैफ हसनने 16 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 तर तानझिद हसनने 25 चेंडूत 1 चौकारांसह 20 धावा जमविल्या. कर्णधार लिटन दासने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा केल्या. हृदोयने परवेज हुसेनसमवेत चौथ्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. परवेज हुसेनने 14 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 28 धावा जमविल्या. परवेज हुसेन बाद झाल्यानंतर हृदोयला शमीम हुसेनने चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 49 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 12 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. हृदोयने 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 51 तर शमीम हुसेनने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे सोढीने 2 तर नाथन स्मिथ आणि क्लार्कसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बांगलादेशच्या डावात 10 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 44 धावा जमविताना 1 गडी गमविला. बांगलादेशने 10 षटकाअखेर 2 बाद 77 धावांपर्यंत मजल मारली होती. हृदोयने 26 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 20 षटकांत 6 बाद 182 (कॅटीन क्लार्क 51, रॉबिनसन 51, निक केली 39, क्लार्कसन नाबाद 27, अवांतर 8, रिशाद हुसेन 2-32, एस. इस्लाम, तंझिम हसन साकीब आणि मेहदी हसन मिराज प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 18 षटकांत 4 बाद 183 ( तौहीद हृदोय नाबाद 51, शमीम हुसेन नाबाद 31, लिटन दास 21, परवेज हुसेन 28, तानझीद हसन 20, सैफ हसन 17, अवांतर 15, सोढी 2-40, नाथन स्मिथ आणि क्लार्कसन प्रत्येकी 1 बळी).