बांगलादेश-न्यूझीलंड टी-20 मालिका बरोबरीत
बिव्हॉन जेकॉब्ज सामनावीर, टी. रिदॉय मालिकावीर
वृत्तसंस्था, मिरपूर
यजमान बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ लेव्हीस नियमाच्या आधारे बांगलादेशचा 6 गड्यांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या जेकॉब्जला सामनावीर तर बांगलादेशच्या टी. रिदॉयला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकून आघाडी मिळविली होती. त्यानंतर उभय संघातील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे शनिवारच्या तिसऱ्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पावसाळी आणि खराब हवामानामुळे हा शेवटचा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली.
बांगलादेशचा डाव 14.2 षटकांत 102 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने 11.4 षटकांत 4 बाद 104 धावा जमवित हा सामना 20 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी जिंकला.
बांगलादेशच्या डावामध्ये रिदॉयने 24 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 33 तर कर्णधार लिटन दासने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26, सलामीचा सैफ हसन 11 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज चुकीचे फटके मारण्याच्या नादात बाद झाले. त्यांच्या तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. बांगलादेशने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबवावा लागला. यानंतरच पंचांनी हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे क्लार्कसनने 9 धावांत 3 तर नाथन स्मिथ आणि बेन सिरेस यांनी प्रत्येकी 2 तसेच लिनॉक्स आणि इश सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावालाही डळमळीत सुरूवात झाली. न्यूझीलंडने पहिल्या दोन षटकांत आपले दोन फलंदाज गमविले. कॅटेनी क्लार्क आणि डेन क्लेव्हर हे फलंदाज बांगलादेशच्या शोरीफुल इस्लामने झेलबाद केले. त्यानंतर शोरीफुल इस्लामने सलामीचा फलंदाज रॉबिनसनचा त्रिफळा उडविला. त्याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. कर्णधार निक केली मेहदी हसन मिराजच्या गोलंदाजीवर त्रिफळा चीत झाला. त्याने एक धाव जमविले. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 5 षटकांत 4 बाद 33 अशी होती. त्यानंतर जेकॉब्ज आणि फॉक्सक्रॉप्ट या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना 5 व्या गड्यासाठी अभेद्य 71 धावांची भागिदारी केली. फॉक्सक्रॉप्टने 15 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. जेकॉब्जने 31 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकविल्या. जेकॉब्जने आपले अर्धशतक 28 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविले.न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शोरीफुल इस्लामने 19 धावांत 3 तर मेहदीहसन मिराजने 20 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 14.2 षटकांत सर्वबाद 102 (रिदॉय 33, लिटन दास 26, सैफ हसन 16, रिशाद हुसेन 5, मेहदी हसन मिराज नाबाद 7, अवांतर 4, क्लार्कसन 3-9, सिरेस आणि नाथन स्मिथ प्रत्येकी 2 बळी, लिनॉक्स आणि इश सोधी प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 11.4 षटकांत 4 बाद 104 (रॉबिनसन 23, क्लार्क 1, क्लेव्हर 1, केली 1, जेकॉब्ज नाबाद 62, फॉक्सक्रॉप्ट नाबाद 15, अवांतर 1, शोरीफुल इस्लाम 3-19, मेहदी हसन मिराज 1-20).