बांगलादेशला विजयासाठी 143 धावांची गरज
वृत्तसंस्था/रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात येथे सुरू असलेली दुसरी क्रिकेट कसोटी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. या सामन्यातील मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी 143 धावांची जरुरी असून त्यांनी दुसऱ्या डावात बिनबाद 42 धावा जमविल्या आहेत.
या मालिकेत बांगलादेशने पहिली कसोटी जिंकून पाकवर यापूर्वीच आघाडी घेतली आहे. आता ते ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र पाकचा संघ मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहे. या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव 274 धावांत आटोपल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 262 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर पाकने केवळ 12 धावांची नाममात्र आघाडी घेतली. पाकने 2 बाद या धावसंख्येवरुन सोमवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 46.4 षटकात 172 धावांत आटोपला. त्यामुळे बांगलादेशला निर्णायक विजयासाठी पाककडून 185 धावांचे आव्हान मिळाले. दिवसअखेर बागंलादेशने दुसऱ्या डावात 7 षटकात बिनबाद 42 धावा केल्या.
पाकच्या दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतक नोंदविता आले नाही. सलमान आगाने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 71 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 47 तर मोहम्मद रिझवानने 5 चौकारांसह 43 धावा जमविल्या. या जोडीने सातव्या गड्यासाठी 55 धावांची भर घातली. बांगलादेशच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकची एकवेळ स्थिती 6 बाद 81 अशी केविलवाणी झाली होती. सईम आयुबने 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बाबर आझम 11 धावांवर झेलबाद झाला. बांगलादेशतर्फे हसन मेहमुद आणि नाहीद राणा यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. हसन मेहमुदने 43 धावांत 5, नाहीद राणाने 44 धावांत 4 गडी तसेच तस्किन अहम्मदने 40 धावांत 1 गडी बाद केला. बांगलादेशने दुसऱ्या डावाला दमदार सुरूवात करताना सात षटकांत बिनबाद 42 धावा जमविल्या. झाकीर हसन 2 षटकार आणि 2 चौकारांसह 31 तर शदमान इस्लाम 9 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 274, बांगलादेश प. डाव 262, पाक. दु. डाव 46.4 षटकात सर्वबाद 172 (सलमान आगा नाबाद 47, मोहम्मद रिझवान 43, शान मसुद 28, सईम आयुब 20, बाबर अझम 11, हसन मेहमुद 5-43, नाहीद राणा 4-44, तस्किन अहम्मद 1-40),