हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी बांगलादेशला घ्यावीच लागेल!
तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा कठोर संदेश : चिन्मय दास यांच्या तपासात पारदर्शकतेची अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलिकडेच इस्कॉनशी संबंधित चिन्मय दास यांना तेथील सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. याच पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही बांगलादेशला कडक संदेश दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारला अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्त्वातील अंतरिम सरकारला घ्यावीच लागेल, असे सुनावले आहे. हिंदूंच्या सुरक्षेसोबतच ‘इस्कॉन’च्या चिन्मय दास यांच्या अटकेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीचा प्रश्न गंभीर होत असताना भारत आपली भूमिका स्पष्ट करत आहे. भारताने बांगलादेश सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आपली बाजू मांडलेली आहे. हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल हल्ले गैर असल्याचे मत भारताने नोंदवलेले आहे. आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारला सर्व अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आम्ही बांगलादेशला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवरही भाष्य
बांगलादेशातील इस्कॉन समूहाचे प्रमुख चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवरही जयस्वाल यांनी भाष्य केले. ‘आम्ही इस्कॉनला सामाजिक सेवेचा मजबूत पाया असलेली जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्था म्हणून पाहतो. चिन्मय दास यांच्या अटकेबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. त्यांच्यावर खटले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. मात्र, या प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक रितीने हाताळल्या जाव्यात. तपास योग्य पद्धतीने व्हायलाच हवा’, असे जयस्वाल यांनी सुनावले. भारतीय अधिकाऱ्यांसह विदेश मंत्रालयाचे या सर्व कार्यपद्धतीवर लक्ष राहणार असून योग्यवेळी हस्तक्षेप करण्याचीही आमची तयारी आहे, असे ते पुढे म्हणाले.
व्यापार दोन्ही बाजूंनी सुरूच
भारतातून बांगलादेशला होणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबतही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली. ‘भारतातून बांगलादेशला मालाचा पुरवठा सुरूच आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश आणि भारत यांच्यातील व्यापार दोन्ही दिशांनी सुरू आहे. त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही’ असे जयस्वाल म्हणाले.