For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशातला आगडोंब

06:52 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशातला आगडोंब
Advertisement

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी साडेपाच दशकांपूर्वी आपल्या सैनिकांनी त्यांचे रक्त सांडले आहे, तो बांगलादेश आज भारतावरच उलटला आहे. त्या देशात आज इस्लामी धार्मिक कट्टरतावादाचा आणि त्याला जोडून येणाऱ्या हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. त्या देशातील अल्पसंख्य समाजांचे, विशेषत: हिंदूंचे भवितव्य अस्थिर आणि असुरक्षित बनले आहे. नुकतीच तेथे दिपू चंद्र दास याची धर्मांध जमावाकडून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. प्रथम त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली आणि तो अर्धजिवित स्थितीत असताना त्याला झाडाला टांगून जाळण्यात आले. हा क्रूरतेचा कळस आहे. त्याच्यावर इस्लामची निंदा केल्याचा तथ्यहीन आरोप जमावानेच ठेवला आणि जमावानेच या खोट्या आरोपाची शिक्षा त्याला त्याचा जीव घेऊन दिली. बांगलादेशाच्या प्रशासनाने त्वरित कारवाईही केली नाही. नंतर भारताने या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर तसेच आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. पण, त्यांच्यावर पुढे कठोर कारवाई होईल अणि दिपू चंद्र दास याला न्याय मिळेल याची शक्यता कमीच आहे. नेहमी मानवाधिकारांच्या नावाने गळे काढणाऱ्या आणि नाकाने कांदे सोलणाऱ्या आंतरराष्ट्रीय समुदायानेही या हत्येकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे. या देशात साधारणत: सव्वा वर्षापूर्वी सत्तांतर झाले. त्या देशाच्या प्रमुख शेख हसीना यांना पलायन करुन भारतात यावे लागले. नंतर त्या देशाची सूत्रे मोहम्मद युनूस नामक प्रशासकाकडे आली आहेत. त्याने सत्ता हाती घेताच आपले ‘खायचे दात’ दाखविण्यास प्रारंभ केला आणि त्या देशातील परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडली आहे. वास्तविक या घडामोडींशी तेथील हिंदू समाजाचा काहीही संबंध नाही. पण झळ या समाजालाच सोसावी लागत आहे. भारतातही या परिस्थितीचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. म्हणूनच तीन दिवसांपूर्वी दिल्लीत बांगलादेशच्या उच्चायोग निवासासमोर हिंदू संघटनांकडून प्रचंड निदर्शने करण्यात आली. कोलकाता येथील या देशाच्या उपउच्चायोग कार्यालयासमोरही मोठे आंदोलन करण्यात आले. पण अशा ‘शांततापूर्ण’ आंदोलनांचा किंवा निषेधांचा त्या देशावर काही परिणाम होईल आणि त्या देशाच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा धरणे व्यर्थ आहे. ही स्थिती त्या देशात अलीकडच्या काळातच निर्माण झाली आहे, असे मुळीच नाही. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. त्या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. तथापि, ज्या कारणांसाठी भारताने हा हस्तक्षेप केला, ती कारणे मात्र या युद्धामुळे किंवा त्यात विजय मिळविल्यामुळे दूर झाली नाहीत. 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासूनच त्या देशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे असंख्य हिंदूंनी भारतात आश्रय घेतला आहे. हिंदूंचे त्या देशातून होणारे पलायन थांबावे यासाठी 1971 चे युद्ध करण्यात आले होते. तथापि, त्यानंतरही बांगलादेशात ‘धर्मनिरपेक्ष’ किंवा सहिष्णु सरकार आलेच नाही. कट्टर धर्मवादाकडे त्या देशाची वाटचाल सुरुच राहिली. आता तर उघडपणे हा देश हिंसक धर्मवादाकडे वेगाने झुकताना दिसत आहे. आता तर भारताचेच तुकडे करण्याची भाषा त्या देशाच्या प्रशासकाकडून केली जात आहे. भारत आणि चीनच्या ताब्यातील तिबेटमध्ये जी केवळ 22 किलोमीटर रुंदीची चिंचोळी पट्टी आहे, ती चीनने ताब्यात घ्यावी, अशी बांगलादेशाची इच्छा आहे. या पट्टीमुळे ऊर्वरित भारत ईशान्य भारताशी जोडला गेला आहे. या पट्टीवरचे भारताचे नियंत्रण सुटावे आणि संपूर्ण ईशान्य भारत भारतापासून तुटावा आणि आपल्या ताब्यात यावा अशी स्वप्ने तो देश पाहू लागला आहे. यासाठी चीनशी संधान बांधण्याची त्याची तयारी आहे. संपूर्ण ईशान्य भारत आपल्या देशाला जोडून त्या देशाने नवा नकाशाही तयार केला आहे आणि तो तुर्कस्थानसारख्या आणखी एका धर्मांध देशाला तो ‘भेट’ म्हणूनही दिला आहे. उपकारांची फेड अपकाराने कशी केली जाते, याचे हे जळजळीत उदाहरण आहे. खरे तर, भारताने 1971 पासूनच या संदर्भात सावध व्हायला हवे होते. पण त्यावेळी आपले सत्ताधीश ‘आपण युद्ध जिंकले’ याच आनंदात मश्गुल होते. पुढेही तशीच परिस्थिती राहिली. पण, त्या देशात काय जळते आहे आणि त्याची झळ केव्हाना केव्हा आपल्यालाच बसणार आहे, हे लक्षात घेतले गेले नाही. आता ती परिस्थिती अगदी स्पष्टपणे भारताला भेडसावत आहे. बांगलादेशच्या रुपाने आणखी एक पाकिस्तान भारताच्या पूर्वेला निर्माण होण्याची प्रक्रिया होत आहे. त्यामुळे भारताने आपल्या संरक्षणाची सज्जता अधिकच बळकटपणे करावयास हवी आहे. कारण वेळ प्रसंग आलाच तर आपल्या सैन्याला आता दोन आघाड्यांवर नव्हे, तर तीन आघाड्यांवर रणसंग्राम करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. आजची स्थिती पाहिली, तर बांगलादेशचे सामरिक सामर्थ्य भारताच्या तुलनेत कस्पटासमान आहे. पण, त्यावर समाधान मानण्यात अर्थ नाही. कारण, आणखी 10 वर्षांनी काय होईल, याचा विचार आत्तापासूनच करुन त्या दृष्टीने संरक्षणसिद्धता ठेवणे आवश्यक आहे. तसेच, बांगलादेशची मस्ती अधिकच वाढली, तर त्या देशाला योग्य वेळी तडाखा देण्याची सज्जताही असली पाहिजे. ‘लातोंके भूत बातोंसे नही मानते’ ही म्हण बांगलादेशच्या संदर्भात सर्वार्थाने खरी ठरत आहे. अर्थातच, भारताला या स्थितीची कल्पना असून त्याने आपल्या संरक्षणाची व्यवस्था चोख केली असेलच, असा विश्वास बाळगता येऊ शकतो. भारताच्या सेनेचा पराक्रम वादातीत आहे. तथापि, भारताचे शस्त्रास्त्र सामर्थ्यही लवकरात लवकर वाढवून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळविता येईल, इतके मोठे बनविण्याची आवश्यकता आहे. तसेच उपकार कोणावर करावेत, आणि ज्याच्यावर ते केले जातात, त्याची लायकी काय आहे, याचीही जाण ठेवणे आवश्यक आहे. आपण ‘चांगले’ आहोत, म्हणून जगही आपल्याशी ‘चांगले’च वागेल या बाळबोध (खरेतर मूर्खपणाच्या) संकल्पनांमधून बाहेर पडून परिस्थितीनुसार स्वत:ला सज्ज ठेवल्यासच संभाव्य संकटावर उपाय सापडू शकेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.