बांगलादेशचे प्रशिक्षक हातुरुसिंघे निलंबित
बांगलादेशचे प्रशिक्षक हातुरुसिंघे निलंबित
► वृत्तसंस्था / ढाका
गेल्या वर्षी भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक चंडीका हातुरुसिंघे यांच्याकडून बेशिस्त वर्तन झाल्याने बांगलादेश क्रिकेट मंडळाने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हातुरुसिंघे यांच्या जागी विंडीजच्या फिल सिमॉन्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंडीका हातुरुसिंघे हे लंकेचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अलिकडेच बांगलादेश क्रिकेट संघाला भारताच्या दौऱ्यामध्ये कसोटी आणि टी-20 मालिकेत व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले होते. 1990 च्या दशकामध्ये विंडीज संघातील सलामीचा फलंदाज फिल सिमॉन्स यांच्याकडे बांगलादेश क्रिकेट मंडळाने प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली आहे. हातुरुसिंघे यांना निलंबित केल्यानंतर केवळ 48 तासांच्या कालावधीत सिमॉन्सची नियुक्ती करण्यात आली. 56 वर्षीय हातुरुसिंघे यांच्याकडे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात बांगलादेश संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपविण्यात आली होती.