For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशकडून आयपीएल प्रसारणावर बंदी

06:20 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशकडून आयपीएल प्रसारणावर बंदी
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सातत्याने बिघडत चाललेले असताना बीसीसीआयच्या निर्देशानुसार वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगमधून वगळल्याच्या निषेधार्थ बांगलादेशने सोमवारी आयपीएलच्या आगामी हंगामाच्या प्रसारणावर बंदी घातली.

येथील मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीसीसीआयने आयपीएलमधील संघ कोलकाता नाइट रायडर्सला 2026 च्या हंगामासाठीच्या संघातून रहमानला मुक्त करण्याचे निर्देश देताना कोणतेही तार्किक कारण दिलेले नाही. आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याचा हा निर्णय बांगलादेशने पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतात जाण्यास नकार दिल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) आपले सर्व लीग सामने स्पर्धेचा सहयजमान असलेल्या श्रीलंकेत स्थलांतरित करण्याची विनंती केल्यानंतर एका दिवसाने घेण्यात आला आहे.

Advertisement

बीसीसीआयच्या या निर्णयामागे (रहमानला वगळण्यामागे) कोणतेही तार्किक कारण ज्ञात नाही आणि अशा निर्णयामुळे बांगलादेशच्या लोकांना दु:ख झाले आहे, त्यांना वेदना झाल्या आहेत आणि ते व्यथित झाले आहेत, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. या परिस्थितीत पुढील आदेशापर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सर्व सामने आणि कार्यक्रमांचे प्रसारण थांबविण्याची विनंती या आदेशान्वये करण्यात येत आहे. हा आदेश योग्य प्राधिकरणाच्या मंजुरीने आणि जनहितार्थ जारी करण्यात आला आहे, असे साहाय्यक सचिव फिरोज खान यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.