बांगलादेश पुन्हा हिंसाचाराच्या वणव्यात
32 जणांचा मृत्यू : शेख हसीनांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी
वृत्तसंस्था/ ढाका
त किमान 32 जण ठार तर 30 जण जखमी झाले. आरक्षणविरोधी आंदोलनात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचार पुन्हा भडकल्यानंतर गृह मंत्रालयाने देशात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.
असहकार आंदोलनाच्या निमित्ताने राजधानी ढाकामध्ये आंदोलकांनी सरकारविरोधी आवाज बुलंद केला. राजधानीतील मुख्य चौकासोबतच सायन्स लॅब, धानमंडी, मोहम्मदपूर, मीरपूर-10, रामपुरा, तेजगाव, फार्मगेट, पंथपथ, जत्राबारी आणि ढाका येथील उत्तरा येथेही निदर्शने झाली. त्यानंतर सरकारविरोधी रॅली काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केल्यानंतर दोन गटांमध्ये प्रचंड राडा झाला.
रस्त्यावर उतरलेले आंदोलक पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या ‘असहकार कार्यक्रमात’ सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार राडा झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी मुन्शीगंजमध्ये निदर्शक आणि अवामी लीग समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान 32 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. निदर्शकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि आरक्षण सुधारणांबाबत नुकत्याच झालेल्या निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी घोषणाबाजी केल्याचे दिसून येत होते.
भारतीयांना सतर्क राहण्याची सूचना
बांगलादेशात उफाळलेल्या या नव्या हिंसाचारानंतर भारताने तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालय, सिल्हेटच्या अखत्यारीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना या कार्यालयाच्या संपर्कात राहण्याची विनंती करण्यात आली आहे. “आपत्कालीन परिस्थितीत 88-01313076402 वर संपर्क साधा.” असे आवाहन उच्चायुक्तालयाने केले आहे.
सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यात संघर्ष
आंदोलक सरकारच्या धोरणांच्या विरोधात आणि निदर्शनांमध्ये मारल्या गेलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले असतानाच सरकार समर्थित गटांनीही शहरात रॅली काढली. यादरम्यान सरकार समर्थकांनी कुमिल्ला येथे आंदोलकांवर गोळीबार केला, ज्यात किमान सात जणांना गोळ्या लागल्या. या हिंसाचारात सुमारे 30 आंदोलक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय देशातील इतर भागातही अशाच प्रकारच्या घटना वाढत असून हिंसाचाराचा वणवा देशभर पसरला आहे.
इंटरनेट, शाळा, विद्यापीठे बंद
हिंसाचार भडकल्यानंतर सरकारने देशातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने देशभरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे. सरकारच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात संघर्ष आणि जीवित व वित्तहानी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशातील शाळा आणि महाविद्यालयातील वर्गही रद्द करण्यात आले आहेत. बांगलादेश पोलिसांनी आतापर्यंत 11 हजार लोकांना अटक केली आहे.